Join us

जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 06:24 IST

सरकारने मागण्या मान्य केल्या, हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा काढला जीआर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जिंकलो रे राजेहो! आपण तुमच्या ताकदीवर...आज कळलं गरिबाची ताकद किती मोठी आहे’ असे आनंदोद्गार मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी हजारो मराठा बांधवांच्या साक्षीने काढले, तेव्हा त्यांच्या जयजयकाराच्या प्रचंड घोषणा झाल्या, टाळ्यांचा अभूतपूर्व कडकडाट झाला. जरांगे यांनी गेल्या पाच दिवसांपासून सुरू केलेल्या उपोषणाला अखेर यश आले आणि सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत जीआर काढले. पाच दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून बसलेल्या आणि राज्यभरात आरक्षण आंदोलनाकडे लक्ष असलेल्या मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळला. सरकारने काढलेले जीआर मान्य करत जरांगे यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले.

आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्र राजे भोसले, यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण सोडले. त्यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि इतर नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा लागला कस; विखे पाटील यांनी संयमाने हाताळली परिस्थिती

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण काळात निर्माण झालेली परिस्थिती, त्यांच्या मागण्यांवर सरकारने घ्यावयाची भूमिका या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाची कसोटी होती पण सर्व गोष्टी योग्य पद्धतीने हाताळल्याचे दिसून आले. त्यांना एकनाथ शिंदे व अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उत्तम सहकार्य केले. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शांतपणे परिस्थिती हाताळली.

विखे पाटील यांनी आझाद मैदानात जाऊन जरांगे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला. त्यानंतर विखे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले. फडणवीस यांनी विशेष लक्ष घालून माझ्याशी चर्चा केली. त्यांच्या पुढाकारामुळे मंत्रिमंडळात एकमताने निर्णय झाला, असे विखे-पाटील म्हणाले.

अश्रू अनावर

मागण्या मंजूर झाल्यानंतर आणि शासनाने तसे अध्यादेश जारी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना मंचावरच अश्रू अनावर झाले.

जिवात जीव आहे तोवर लढणार

छत्रपती शिवाजी महाराज वारंवार लढले म्हणून स्वराज्य मिळाले. मलाही तसेच लढावे लागेल. मला स्वत:ला काहीही नको आहे रे! माझा लढा तुमच्यासाठी आहे. माझ्या जिवात जीव आहे तोवर मी लढा सुरूच ठेवणार, माझी नेहमीच बलिदानासाठी तयारी आहे. माझ्या जागी दुसरा कोणी असता तर करोडो रुपये कमावून घरी बसला असता. मी समाजाचे वाटोळे कधीही होऊ देणार नाही, असे जरांगे पाटील यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितले.

मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर नेमके काय झाले?

  • हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय जारी करा - मान्य
  • मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या - मान्य
  • आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत, शासकीय नोकरी द्या - मान्य
  • प्रलंबित जात पडताळणीला मान्यता द्या - मान्य
  • आंदोलकांच्या वाहनांवरील दंड मागे घ्या - मान्य
  • सातारा संस्थान, पुणे व औंध संस्थान गॅझेटियरची अंमलबजावणी करा - १ महिन्याची मुदत
  • मराठा-कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय जारी करा - २ महिन्यांची मुदत
टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलमराठा आरक्षणराधाकृष्ण विखे पाटीलशिवेंद्रसिंहराजे भोसले