Join us

मी तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होतो; चूक मान्य करत जरांगेंनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 18:10 IST

अजय महाराज बारस्कर यांनी आज पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) :मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या वादात सापडले आहेत. जरांगे पाटील यांनी नुकत्याच केलेल्या उपोषणादरम्यान त्यांना पाणी पिण्याचं आवाहन करण्यासाठी गेलेल्या ह.भ.प. अजय महाराज बारस्कर यांच्याशी बोलताना संतांबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केली. जरांगे पाटील यांच्या या टिपण्णीने संतापलेल्या बारस्कर यांनी आज पत्रकार परिषद घेत जरांगेंवर घणाघाती आरोप केले. त्यानंतर जरांगे पाटलांनी माघार घेत संत तुकाराम महाराज यांची माफी मागितली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "माझ्या तोंडून चुकीचे शब्द गेले असतील तर मी तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होऊन त्यांची माफी मागतो. माझ्या आयुष्यातील ही पहिली माफी आहे. मात्र मी तुकाराम महाराजांना मानतो. मी वापरलेले ते शब्द मागे घेतो," अशा शब्दांत जरांगे पाटलांनी आपली चूक मान्य केली.

सरकारवर हल्लाबोल

तुकाराम महाराजांची माफी मागत असताना मनोज जरांगे पाटील यांनी अजय महाराज बारस्कर यांच्यासह राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. "अजय महाराज बारस्कर हा सरकारचा ट्रॅप आहे. तुकाराम महाराजांच्या आडून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाकीच्या आरोपांना मी महत्त्व देत नाही. उपोषणाच्या काळात माझी चिडचिड होते. त्या चिडचिडीतून माझे काही शब्द गेले असतील, त्यावर माझी सपशेल माघार आहे. कारण मी वारकरी संप्रदायाचा शिष्य आहे. मात्र सरकारने तुकाराम महाराजांच्या आडून ट्रॅप टाकू नये, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील," असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

बारस्कर महाराजांची जरांगेंवर टीका

अजय महाराज बारस्कर यांनी आज पत्रकार परिषद घेत म्हटलं आहे की, "मनोज जरांगे हे पारदर्शक आहेत, कॅमेऱ्यासमोर बोलतात, अधिकारी, मंत्र्यांसोबत दरडावून बोलतात  म्हणून समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. मराठा समाजाला खरं बोललेलं आवडतं म्हणून समाजानं त्यांच्यावर प्रेम केलं. मात्र समाज फुटला  असा संदेश जाऊ नये, म्हणून मी आतापर्यंत गप्प होतो. मनोज जरांगे पाटील हे सरकारकडे एकही निवेदन देत नाही. मात्र त्यांनी एक निवेदन माझ्यासमोर कॅमेऱ्यासमोर लिहून दिलं आहे. त्यांच्या ज्या चार प्रमुख मागण्या आहेत त्या त्यांनी माझ्यासमोर लिहून दिल्या आहेत. तरीही मनोज जरांगे पाटील हे  रोज पलटी मारतात. सातत्याने भूमिका बदलतात आणि नेहमी खोटं बोलतात," असा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलमराठा आरक्षणजालना