"मनोज जरांगेंना लोकसभेची उमेदवारी, या मतदारसंघातून लढणार"; भाजपा नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 02:45 PM2024-02-27T14:45:10+5:302024-02-27T14:50:25+5:30

मनोज जरांगे पाटील महाविकास आघाडीकडून लोकसभेचे उमेदवार असू शकतील, असा दावाच त्यांनी केला आहे.

Manoj Jarange Lok Sabha candidature of MVA, will contest from this constituency of beed; BJP leader's claim | "मनोज जरांगेंना लोकसभेची उमेदवारी, या मतदारसंघातून लढणार"; भाजपा नेत्याचा दावा

"मनोज जरांगेंना लोकसभेची उमेदवारी, या मतदारसंघातून लढणार"; भाजपा नेत्याचा दावा

मुंबई - मी राजकारणात जाणार नाही, निवडणूक लढवणार नाही, असे मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच सांगितले आहे. मात्र, गेल्या २ दिवसांपूर्वी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला लक्ष्य केलं. यावेळी, त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर, भाजपा नेत्यांकडून जरांगेंच्या विधानाचा निषेध नोंदवण्यात आला असून त्यांचा बोलवता धनी कोण?, असा सवालही विचारला जात आहे. त्यातच, आता भाजपा नेते आशिष देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील महाविकास आघाडीकडून लोकसभेचे उमेदवार असू शकतील, असा दावाच केला आहे.  

मनोज जरांगेंनी केलेला आरोप फेटाळत देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंची स्क्रीप्ट शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची असल्याचं वाटतं, असे म्हणत जरांगेंच्या पाठिशी कोण आहे, असा सवाल केला. त्यातच, आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेनादरम्यान, जरांगे यांच्या विधानांची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याची मागणीही विधानसभेत झाली. त्यानुसार, आता जरांगेंच्या आंदोलन चौकशीसाठी एसआयटी नेमण्यात येणार आहे. दुसरीकडे जरांगेंच्या पाठिशी राष्ट्रवादी शरद पवार गट असल्याचा आरोप होत आहे. त्यातच, आमदार आशिष देशमुख यांनी जरांगेच्या राजकीय प्रवेशाचा दावा केला आहे. 

"बीड लोकसभा मतदारसंघातून जरांगे यांना शरद पवार गट निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. जरांगे यांना सुरुवातीपासूनच राजकीय महत्त्वकांक्षा होती, म्हणूनच त्यांनी मराठा आरक्षणाचा आंदोलन उभं केलं आणि एवढे महिने लांबवलं. आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत बीडची जागा मिळावी म्हणून पवार गटाचे प्रयत्न राहणार असणार आहे. ती जागा शरद पवार गटाला सुटल्यानंतर तिथे मनोज जरांगे यांना उमेदवारी दिली जाईल, असेही देशमुख म्हणाले. तसेच, आमदार राजेश टोपे सातत्याने मनोज जरांगे यांना भेटून आंदोलनाची दिशा निश्चित करत होते, असा आरोपही आशिष देशमुख यांनी केला आहे. 

दरम्यान, मनोज जरांगे हे मूळ बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहेत, त्यांच्या आंदोलनास बीडमधून मोठा पाठिंबाही मिळाला. त्यामुळे, बीड जिल्ह्यातून त्यांच्या उमेदवारीची चर्चा होत असून सध्या बीडमधून भाजपा नेत्या प्रीतम मुंडे विद्यमान खासदार आहेत. 

प्रकाश आंबेडकरांनीही केलं होतं आवाहन

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही जरांगेंना लोकसभा निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं होतं. "मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे अजूनही सर्व मराठा समाज आहे.  काँग्रेस असो की भाजप या दोघांनाही मतदान करू नका असे आवाहन त्यांनी समाजाला करावे. तसेच जरांगे यांनी स्वतः जालना जिल्ह्यातून अपक्ष निवडणूक लढवावी. म्हणजे, त्यांचा अण्णा पाटील होणार नाही,'' असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. तसेच, ओबीसींचे न घेता मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण देण्याची भूमिका सरकारने घ्यावी,'' असेही आंबेडकर यांनी जरांगेंबाबात बोलताना म्हटले होते. 

Web Title: Manoj Jarange Lok Sabha candidature of MVA, will contest from this constituency of beed; BJP leader's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.