‘एटीएम’मध्ये हेराफेरी, हाती देतात बनावट कार्ड; मालाडमधील तरुणाची भामट्याकडून फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:40 IST2025-09-28T13:40:30+5:302025-09-28T13:40:48+5:30
बँकेतही पैसे भरण्याच्या रांगेत नोटा कमी आहेत, या क्रमांकाच्या नोटा बंद झाल्या आहेत, अशी अनेक कारणे पुढे करत मदतीच्या बहाण्याने खातेदारांच्या पैशांवर डल्ला मारल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

‘एटीएम’मध्ये हेराफेरी, हाती देतात बनावट कार्ड; मालाडमधील तरुणाची भामट्याकडून फसवणूक
मुंबई : बँकांच्या एटीएम केंद्रांमध्ये मदतीच्या बहाण्याने अनेक भामटे कार्डची अदलाबदल करून फसवणूक करत असल्याचे पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या घटनांमधून उघडकीस आले आहे. त्यात विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जाते. त्यामुळे अशी मदत घेण्यापूर्वी सतर्क राहावे. तसेच आपल्या एटीएम कार्डचा पिन क्रमांक कुणालाही दिसणार नाही, याचीही खबरदारी घ्या, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येते.
मालाड स्टेशन रोड परिसरातील एका एटीएममध्ये ३८ वर्षीय तरुण पैसे काढण्याकरिता डेबिट कार्ड व पिन क्रमांक टाकत असताना पाठीमागे उभ्या असलेल्या व्यक्तीने लवकर पैसे काढण्याच्या सूचना दिल्या. बोलण्याच्या नादात चुकीचा पिन क्रमांक टाकल्याने पैसे निघाले नाहीत. त्या व्यक्तीने पैसे काढण्याकरिता मदतीच्या बहाण्याने डेबिट कार्ड घेतले. मात्र, एटीएममध्ये पैसे नाहीत, असे सांंगत डेबिट कार्ड तरुणाकडे सोपवून तो निघून गेला. पैसे निघत नसल्याने चौकशी करताच कार्ड वेगळे असल्याचे तरुणाला समजले.
नोटा कमी असल्याचे सांगून करण्यात आली लूट
बँकेतही पैसे भरण्याच्या रांगेत नोटा कमी आहेत, या क्रमांकाच्या नोटा बंद झाल्या आहेत, अशी अनेक कारणे पुढे करत मदतीच्या बहाण्याने खातेदारांच्या पैशांवर डल्ला मारल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
बनावट एटीएम कार्ड देत आराेपी पसार
पैसे काढण्यासाठी मदतीच्या बहाण्याने भामटे सफाईने बोलण्यात गुंतवतात आणि एटीएम कार्ड काढून घेत स्वतःकडील बोगस कार्ड सोपवतात.