Join us

नाईकांचं राजकीय अस्तित्वच धोक्यात म्हणून भाजपा प्रवेशाचा घाट- मंदा म्हात्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 12:15 IST

गणेश नाईक यांच्या राजकारणातल्या एकेकाळच्या प्रतिस्पर्धी आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नाईक कुटुंबीयांच्या भाजपा प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईः काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईतल्या गरवारे क्लब येथे भाजपामध्ये जाहीररीत्या प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईकांसह नवी मुंबईतील काही नगरसेवकांसह राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर गणेश नाईक यांच्या राजकारणातल्या एकेकाळच्या प्रतिस्पर्धी आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नाईक कुटुंबीयांच्या भाजपा प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.त्या म्हणाल्या, इतर पक्षातून आमच्याकडे नेते आहेत, त्यामुळे पक्ष मोठा होतो आहे हे चांगलं आहे. भाजपाच विकास करू शकतो हे त्यांना आता समजलं. कालपर्यंत हेच लोक मुख्यमंत्र्यांवर टीका करत होते, आज त्यांना हेच विकास करू शकतात हे समजलं. संघर्ष हा जीवनात सुरूच असतो. मी 25 वर्षं संघर्ष करून इथपर्यंत पोहोचले. नाईकांचं राजकीय अस्तित्वच धोक्यात आल्यानं ते भाजपात येत आहेत. जुन्या लोकांवर अन्याय होणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे. माझा मतदारसंघ माझ्यासाठी अबाधित राहील हे फडणवीसांनी सांगितल्याचा उल्लेख मंदा म्हात्रे यांनी केला आहे. दुसरीकडे नाईक परिवाराच्या भाजप प्रवेशानंतर बेलापूर मतदारसंघातील गुंता पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारीचे आश्वासन दिलं असलं तरी शिवसेनाही या मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्या उमेदवारीविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ अशी बेलापूरची एकेकाळी ओळख होती. 2004मध्ये या मतदारसंघाचे विभाजन होऊन त्याचे कार्यक्षेत्र बेलापूर ते वाशीपर्यंत मर्यादित झाले. या मतदारसंघावर माजी मंत्री गणेश नाईक यांचे अनेक वर्षांपासून एकहाती वर्चस्व होते. चार वेळा ते या मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. 2014मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये मंदा म्हात्रे यांनी त्यांचा पराभव केला. यावर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाईक परिवारानं भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पुन्हा गणेश नाईक या मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. पण आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध करून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून, त्यांना उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले आहे. यामुळे गणेश नाईक भाजपमध्ये जाणार का व बेलापूरमधून निवडणूक लढणार की नाही, याविषयी शंका उपस्थित होऊ लागली आहे. शिवसेना व भाजप युतीमध्ये बेलापूर मतदारसंघ शिवसेनेकडे आहे.  

टॅग्स :मंदा म्हात्रेनवी मुंबईगणेश नाईक