मरीन ड्राईव्हवर मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा; वाचवायला गेलेल्या कर्मचाऱ्यांवर तरुणाने उचलला हात अन् थेट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:55 IST2025-08-06T12:51:11+5:302025-08-06T12:55:32+5:30

मरीन ड्राईव्ह येथे समुद्रात उडी घेणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाने वाचवलं.

Man jumped into the sea on Marine Drive fire brigade saved his life | मरीन ड्राईव्हवर मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा; वाचवायला गेलेल्या कर्मचाऱ्यांवर तरुणाने उचलला हात अन् थेट...

मरीन ड्राईव्हवर मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा; वाचवायला गेलेल्या कर्मचाऱ्यांवर तरुणाने उचलला हात अन् थेट...

Mumbai Crime: मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह येथील समुद्रकिनारी एका व्यक्तीने आत्महत्येसाठी पाण्यात उडी घेतल्याने एकच खळबळ उडाली. रात्री अडीच वाजता घडलेल्या या घटनेत, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने बचाव कार्य सुरू केले. सुमारे दीड तास चाललेल्या या हाय व्होल्टेज ड्राम्यादरम्यान, त्या व्यक्तीने दोनदा समुद्रात उडी मारली आणि बचाव कर्मचाऱ्यांशी झटापटही केली. मात्र अग्निशमन दलाच्या शौर्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला. सध्या तो रुग्णालयात दाखल आहे आणि त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मंगळवारी मध्यरात्री हा सगळा प्रकार घडला. घटना घडली तेव्हा मरीन ड्राइव्हवर तैनात असलेले पोलीस कर्तव्यावर होते. त्यावेळी अचानक एक माणूस समुद्राकडे धावत गेला आणि त्याने थेट पाण्यात उडी मारली. या सगळ्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी त्याला थांबवण्यासाठी लगेच त्याच्या मागे धाव घेतली, पण तो अंधारात गायब झाला. त्यानंतर अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आलं. काही वेळातच अग्निशमन दलाचे पथक आलं आणि त्यांनी अंधारात समुद्रात शोधकार्य सुरु केलं.

सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर, तो माणूस दूर एका दगडावर उभा असलेला बचाव पथकाला दिसला. अग्निशमन दलाचे कर्मचारी त्याच्यापर्यंत पोहोचताच त्याने पुन्हा एकदा समुद्रात उडी मारली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये पु्न्हा एकदा चिंता निर्माण झाली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या एका जवानानेही जराही वेळ न घालवता थेट पाण्यात उडी मारली आणि त्याला पकडले. पण त्या व्यक्तीने स्वतःला सोडवण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांशी झटापट केली आणि त्यांच्यावर हात उचलला. नंतर अग्निशमन दलाचे इतर कर्मचारीही त्याच्यापर्यंत पोहोचले आणि बऱ्याच प्रयत्नांनी त्याच्यावर नियंत्रण मिळवलं आणि त्याला बाहेर काढलं.  समुद्रात उडी मारणाऱ्या व्यक्तीचे वय ३५ ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे. 

बाहेर काढताच त्या व्यक्तीला रुग्णवाहिकेतून तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. समुद्रात उडी मारल्याने आणि खडकांवर आदळल्याने तो जखमी झाला होता. सध्या ती व्यक्ती कोण आहे आणि तो आत्महत्या करण्याचा का प्रयत्न करत होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ओळख पटवून पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. सुमारे दीड तास चाललेल्या या हाय-व्होल्टेज ड्राम्यानंतर, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे अखेर त्या व्यक्तीचा जीव वाचला.

दरम्यान, यापूर्वी कफ परेड इथल्या गीता नगर येथे एक व्यक्ती आत्महत्येच्या उद्देशाने खोल समुद्रात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस शिपाई रंधवे यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून स्थानिक मच्छीमार बोटीच्या सहाय्याने समुद्रात जावून त्या व्यक्तीचा जीव वाचवला.
 

Web Title: Man jumped into the sea on Marine Drive fire brigade saved his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.