मुंबई कुर्ला रेल्वे स्थानकात दुपारी दीड वाजता एक माणूस प्लॅटफॉर्मवरुन उतरला आणि शांतपणे रेल्वे रुळांवर जाऊन झोपला. त्याच्या या कृतीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. काहीजणांनी हे दृष्य पाहून आरडाओरड केली, तर काहीजणांना आता पुढे काय होणार, असा प्रश्न सतावू लागला. तितक्यात रेल्वे सुरक्षा दलाच्या एका कर्मचाऱ्यानं रेल्वे रुळांवर उडी घेतली. यानंतर काही उपस्थित प्रवाशीदेखील रेल्वे रुळांवर उतरले. त्यांनी त्या प्रवाशाला रुळांवरुन बाजूला करण्यास सुरुवात केली आणि मोठा अनर्थ टळला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यासह उपस्थितांनी रेल्वे रुळांवर धाव घेतल्यानं प्रवाशाचा जीव वाचला. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या प्रवाशाचं नाव नरेंद्र दामाजी कोटेकर असल्याची माहिती मिळत आहे. कौटुंबिक समस्यांना कंटाळून कोटेकर आत्महत्या करण्यासाठी कुर्ला स्थानकात आले होते, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. या घटनेची माहिती पोलिसांनी कोटेकर यांच्या कुटुंबाला दिली. त्यानंतर त्यांना समुपदेशनासाठी पाठवण्यात आलं.
Video : आयुष्य संपवण्यासाठी 'तो' रेल्वे रुळांवर झोपला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 18:18 IST