चालकाच्या एका चुकीने मालाडमध्ये दोन निष्पापांचा बळी; स्कूटी थेट ट्रेलरच्या चाकाखाली आली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:40 IST2025-12-19T15:17:12+5:302025-12-19T15:40:20+5:30
मालाडमध्ये रस्त्यावर उभ्या ट्रेलरला दुचाकीची धडक बसल्याने दोन महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

चालकाच्या एका चुकीने मालाडमध्ये दोन निष्पापांचा बळी; स्कूटी थेट ट्रेलरच्या चाकाखाली आली अन्...
Malad Accident: मालाडच्या एव्हरशाईन नगर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने उभ्या असलेल्या ट्रेलरला स्कूटीची जोरदार धडक बसून दोन तरुण विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे ओरलेम परिसरातील स्थानिक ख्रिस्ती समुदायावर आणि मृतांच्या मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घटलं?
बुधवारी रात्री १०:०९ च्या सुमारास मालाड पश्चिम येथील धीरज कीर्ती रोडवरील रायन इंटरनॅशनल स्कूलजवळ हा भीषण अपघात झाला. १८ वर्षांचा रिज इर्विन डिसोझा आणि १७ वर्षांची केल्यान अलिशिया फर्नांडिस हे दोघे ज्युपिटर स्कूटीवरून धीरज कीर्ती सोसायटीच्या दिशेने जात होते. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका मोठ्या ट्रेलरच्या मागील चाकाला त्यांची स्कूटी जोरात धडकली. धडक इतकी भीषण होती की स्कूटी थेट ट्रेलरच्या चाकाखाली अडकली.
मदतीसाठी धावले स्थानिक
अपघातानंतर दोघेही रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडले होते. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने स्थानिकांच्या मदतीने रिक्षामधून त्यांना जवळच्या नर्सिंग होममध्ये नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. दुर्दैवाने, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
चर्चच्या कामात होते सक्रिय; परिसरात हळहळ
रिज आणि केल्यान हे दोघेही मालाडमधील आवर लेडी ऑफ लुर्ड्स चर्चच्या युथ असोसिएशनचे सक्रिय सदस्य होते. केल्यान फर्नांडिस ही एव्हरशाईन नगरसाठी विभागीय समन्वयक म्हणून काम पाहत होती. तर रिज डिसोझा चर्चमधील सजावट समितीचा महत्त्वाचा सदस्य होता. नाताळ सण काही दिवसांवर असतानाच या दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने मित्रपरिवारात मोठा धक्का बसला आहे.
ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल
बांगूर नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रेलर अशा पद्धतीने उभा करण्यात आला होता ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र आव्हाड यांनी सांगितले की, ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अवैध पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेनंतर स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. एव्हरशाईन नगर आणि मिठचौकी सिग्नल परिसरात अवैध पार्किंगची मोठी समस्या आहे. प्रशासनाने अशा धोकादायक पद्धतीने उभ्या असलेल्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.