नाकात, डोळ्यात मिरचीची पूड, शेवटी ग्लास फेकून मारला अन्...; ९१ वर्षीय आजीने चोराला लावलं पळवून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 16:04 IST2025-01-15T15:58:23+5:302025-01-15T16:04:50+5:30
मालाडमध्ये एका ९१ वर्षीय आजीने चोराशी दोन हात करत त्याला हुसकावून लावलं.

नाकात, डोळ्यात मिरचीची पूड, शेवटी ग्लास फेकून मारला अन्...; ९१ वर्षीय आजीने चोराला लावलं पळवून
मुंबई :मुंबई उपनगरातील उच्चभ्रू सोसायटीत वृद्धांवर हल्ले करून लुबाडण्याचे प्रकार वाढत असतानाच एका आजीने चोरांशी दोन हात करत त्यांना पळवून लावल्याचे मालाडमध्ये समोर आले आहे. मालाडच्या मालवणी येथील गेट क्रमांक ८ परिसरात ही घटना घडली असून, चोरांना पळवून लावण्याची जिद्द दाखवणाऱ्या या महिलेचे नाव आयेशा शेख (९१) असे आहे. यावेळी तिने स्वतःचा जीव आणि दागिने दोन्ही चोरांपासून वाचवण्यात यश मिळवले.
हा प्रकार १२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ च्या दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा नमाज अदा करण्यासाठी बाहेर गेल्याने सायंकाळी त्या घरात एकट्याच होत्या. यावेळी घराचा दरवाजा उघडा होता आणि त्या स्वयंपाकघरात भांडी घासत होत्या. यावेळी मागून कोणीतरी त्यांच्या गळ्यात हात घातला. मागे एक बुरखाधारी महिला असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
शेवटपर्यंत दिला लढा
बुरखाधारी महिलेने शेख यांच्या तोंडावर मिरची पावडर टाकत त्यांच्या गळ्यातील दीड लाखांची सोन्याची चेन खेचण्याचा प्रयत्न केला.
शेख यांनी ती घट्ट पकडून ठेवली. त्या महिलेने त्यांना, तसेच दारापर्यंत खेचत नेले, मात्र शेवटपर्यंत शेख यांनी हातातील सोनसाखळी सोडली नाही.
दुसऱ्या हातात आलेले काचेचे ग्लास तिच्या दिशेने फेकून मारत आरडाओरड केली. हे पाहून बुरखाधारी चोर बिथरली आणि घटनास्थळाहून पसार गेली.
या प्रकरणी तक्रार मिळाल्यावर अनोळखी व्यक्तीविरोधात बीएनएस कायद्याचे कलम ३०९ (५), ६२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या तांत्रिक तपास सुरू असल्याचे मालवणी पोलिसांनी सांगितले.
मसाल्याची होळीच खेळले!
चोराने माझी मान पकडली, त्यावेळी मी बेसावध होते. मी जशी मागे वळाले, तशी तिने माझ्या अंगावर मिरचीची पूड उधळली. मी परिधान केलेल्या मॅक्सी, ओढणी तसेच नाक डोळे, तोंड या सगळ्यावर मसाला पूड पडली. जणू मसाल्याची होळीच खेळल्यासारखी माझी अवस्था झाली होती. मात्र, मी घाबरले नाही आणि त्यामुळे चोराला हुसकावून लावू शकले - आयेशा शेख, तक्रारदार.