आमदार सोपलांच्याजागी मकरंद निंबाळकर? राष्ट्रवादीचंही ठरलंय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 10:13 IST2019-08-20T09:53:44+5:302019-08-20T10:13:19+5:30
आमदार सोपल यांच्या पक्षबदलीनंतर राष्ट्रवादीचा चेहरा कोण? असा प्रश्न जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

आमदार सोपलांच्याजागी मकरंद निंबाळकर? राष्ट्रवादीचंही ठरलंय
मुंबई - सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून तगड्या उमेदवाराचा शोध सुरू असताना, आता मकरंद निंबाळकर यांचे नाव पुढे येत आहे. आ. दिलीप सोपल यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशानंतर बार्शीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून शोध सुरू आहे. त्यासाठी, अगोदर मोहळचे माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांचे नाव पुढे आले होते. त्यानंतर, आता बार्शी मतदारसंघातील उमेदवार असल्यानं मकरंद निंबाळकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
आमदार सोपल यांच्या पक्षबदलीनंतर राष्ट्रवादीचा चेहरा कोण? असा प्रश्न जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. त्यासाठी, अजित पवार यांच्या मर्जीत असणारे आणि बार्शी नगर पालिकेचे विद्यमान विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, माजी सभापती युवराज काटे, अॅड. विकास सावळे, माजी जि.प.सभापती मकरंद निंबाळकर या नावाची चर्चा पक्षपातळीवर होती. राष्ट्रवादीच्या सोलापूर जिल्हा मुलाखतीवेळी वरील नावांपैकी कोणीही इच्छा प्रदर्शित केली नाही. दरम्यान, आमदार सोपल यांचा पक्षप्रवेश मुहूर्त लांबणीवर पडत असल्याने राष्ट्रवादीची नेतेमंडळी चांगलीच संभ्रमात होती. मात्र, नुकतेच शहर आणि ग्रामीण असे दोन वेगवेगळे निर्धार मेळावे घेऊन सोपल यांनी दिलेल्या 8 दिवसांच्या अल्टीमेटममुळे पुन्हा राष्ट्रवादीची शोधमोहीम जोरात सुरू झाली.
या निर्धार मेळाव्यातील नागेश अक्कलकोटे, काटे, यांची सक्रिय नियोजनातील जबाबदारी पाहून ती नावे मागे पडली. तर, निंबाळकर यांच्या अनुउपस्थितीमुळे त्यांच्याशी पक्षाने संपर्क वाढवला आहे. बाळराजे पाटील हे मोहोळ मतदारसंघात येतात, तर मकरंद निंबाळकर हे वैरागचे रहिवासी असल्याने ते खुद्द बार्शी मतदारसंघाचे हक्काचे उमेदवार ठरतील. त्यामुळे सोपल गटातील आ. सोपल गटातील मोठे सहकारी असणारे मकरंद निंबाळकर हे माजी आमदार नाना निंबाळकर यांचे पुतणे, जिल्हा दूध संघाचे संचालक, जि.प.चे राष्ट्रवादीचे माजी गटनेते, जि.प.चे माजी बांधकाम आणि अर्थ सभापती, अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे. त्यामुळे पक्षाने निंबाळकर यांच्या नावालाच पसंती दिली आहे. निंबाळकर यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने वैराग भागातील तगडी उमेदवारी म्हणून निंबाळकर यांच्या उमेदवारीकडे पाहिले जात आहे.