Join us

मेकअप आर्टिस्टवर जुन्या वादातून रॉड, विटांनी हल्ला; तीन जणांवर वाकोला पोलिसांत गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 08:47 IST

उसने दिलेले पैसे मागितल्यामुळे मारहाण झाल्याची तक्रार चव्हाण याने केली असून, या प्रकरणी वाकोला पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : सांताक्रूझ पूर्व येथे बार मॅनेजरसोबत झालेल्या वादातून सलमान खान प्रोडक्शनमध्ये मेकअप आर्टिस्ट असलेल्या पालेश्वर चव्हाण (३१) याच्यावर रॉड, विटाने हल्ला करण्यात आला. उसने दिलेले पैसे मागितल्यामुळे मारहाण झाल्याची तक्रार चव्हाण याने केली असून, या प्रकरणी वाकोला पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

सांताक्रूझ पूर्व परिसरातल्या कलिना येथे एका बारमध्ये सतीश नावाची व्यक्ती मॅनेजर म्हणून काम करते. त्याला दिलेले उसने पैसे चव्हाण याने मागितले असता तो टाळाटाळ करू लागला. रात्री उशिरा बार बंद झाल्यानंतर मॅनेजर व चव्हाण यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी सतीशच्या मित्राने बारचा वॉचमन व वेटरला बोलावले.

अंगावरील दागिनेही झाले गहाळ

 त्यांनी लोखंडी रॉड, विटाने चव्हाण याला जबर मारहाण केली. या भांडणात त्यांच्या अंगावरील दागिनेही गहाळ झाले असून काही वेळाने तिथे आलेल्या पोलिसांनी उपचारासाठी जखमी चव्हाण यांना व्ही एन देसाई रुग्णालयात दाखल केले.

 उपचार झाल्यानंतर चव्हाण यांनी वाकोला पोलिसात धाव घेत हल्लेखोरांविरोधात तक्रार केली. त्यानुसार पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस