ट्रान्सपोर्ट हब बनवा; नोकरदारांसाठी लोकल, मेट्रो वाढवा; लोकलच्या गर्दीवर प्रवासी संघटनेने सुचवला उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 14:11 IST2024-10-14T14:10:55+5:302024-10-14T14:11:22+5:30
मुंबईतील लोकल सेवेसंदर्भात पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) यांच्याकडे संघटनेने विविध मागण्या केल्या आहेत.

ट्रान्सपोर्ट हब बनवा; नोकरदारांसाठी लोकल, मेट्रो वाढवा; लोकलच्या गर्दीवर प्रवासी संघटनेने सुचवला उपाय
मुंबई : मुंबई आणि उपनगरांच्या दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणात सरकारी, खासगी कार्यालये आहेत, तर उत्तरेच्या बाजूला निवासी क्षेत्र आहे. त्यामुळे उपनगरी लोकल गाड्यांना सकाळी मुंबईच्या दिशेने, तर सायंकाळी मुंबईच्या बाहेर जाताना प्रवाशांची मोठी गर्दी होते. पालघर, बोईसर, वसई, वाडा, भिवंडी, कल्याण, कर्जत व नवी मुंबई परिसरात मोठे औद्योगिकरण झाले आहे. त्यामुळे येथे ट्रान्सपोर्ट हब बनवून येथे लोकल व मेट्रोंची संख्या वाढवल्यास सकाळी व सायंकाळी लोकलच्या अप आणि डाऊन मार्गांवरील गर्दी कमी होईल, याकडे आमची पश्चिम रेल्वे मुंबई प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
मुंबईतील लोकल सेवेसंदर्भात पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) यांच्याकडे संघटनेने विविध मागण्या केल्या आहेत. पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा येथे सर्वांत जास्त लोकवस्ती आहे. सकाळी कामाच्या वेळी विरारला रिटर्न जाऊन पुन्हा येण्यात वेळ वाया जात असल्याने सकाळी ७ ते १० दरम्यान प्रत्येक २० मिनिटांनी यशवंतनगर यार्डमधून लोकल प्लॅटफॉर्म नंबर २ वर आणून नालासोपारा ते चर्चगेट, दादर, अंधेरी अशा लोकल सुरू कराव्यात. विरार-चर्चगेट लोकलमध्ये नालासोपारा येथील प्रवासी रिटर्न येऊन प्रवास करत असल्याने सकाळी ६:३० ते १० या वेळेत विरारला येणाऱ्या जलद मार्गावरील सर्व लोकल नालासोपारा प्लॅटफॉर्म नंबर ३ वर न थांबवता त्या थेट वसईवरून विरारला आणाव्यात, असे संघटनेचे म्हणणे आहे.
विरार-अंधेरी दरम्यान जलद लोकल द्या
नालासोपारा प्लॅटफॉर्म नंबर १ वरील सर्व लोकल नेहमीप्रमाणे थांबवाव्यात. विरार लोकलमध्ये विरारकरांना अंधेरी, वांद्रेपर्यंत बसण्यासाठी जागा मिळत नाही.
सकाळी ७ ते १० या गर्दीच्या वेळेत प्रत्येक २० मिनिटांनी विरारच्या नारंगी रोड व यशवंतनगर येथील यार्डमधून प्लॅटफॉर्म ६ व १ वरून विरार ते चर्चगेट, दादर, अंधेरी अशा जलद लोकल सुरू कराव्यात. विरार-चर्चगेट लोकल सकाळच्या वेळेत अंधेरी येथे ३० टक्के रिकाम्या होतात.
सकाळी ७ ते १० तसेच सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत विरार-अंधेरी दरम्यान प्रत्येक २० मिनिटांनी जलद लोकल चालवाव्यात. सायंकाळी गर्दीच्या वेळी ७:२५
ते रात्री ८.१३ दरम्यान दोन अंधेरी-विरार लोकल सुरू कराव्यात, अशा मागण्या केल्याचे संघटनेचे यशवंत जडयार यांनी सांगितले.