Mumbai: वर्षाभरात ६१ क्लास वन अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात; तरीही २०९ लाचखोरांचे निलंबन नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 15:55 IST2025-11-20T15:54:52+5:302025-11-20T15:55:22+5:30
Bribe: न्याय देणारे न्यायाधीशही लाचखोरीत अडकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Mumbai: वर्षाभरात ६१ क्लास वन अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात; तरीही २०९ लाचखोरांचे निलंबन नाही!
मुंबई : न्याय देणारे न्यायाधीशही लाचखोरीत अडकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यापाठोपाठ गेल्या साडेदहा महिन्यांत ६१ क्लास वन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांत लाचखोरीच्या कारवाईत अडकलेल्यांवर निलंबन, बडतर्फीची कारवाई करण्यास प्रशासनाला मुहूर्त मिळत नसल्याची माहिती एसीबीच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. अद्यापही २०९ लाचखोरांचे निलंबन झालेले नाही. त्यामुळे ते खुर्चीत ठाण मांडून आहेत. यामध्ये सर्वाधिक क्लास वन आणि क्लास टूच्या ७२ जणांचा समावेश आहे.
एसीबीच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते १७ नोव्हेंबरदरम्यान ५९७सापळा कारवाईसह ६१० गुन्हे नोंद झाली आहे. यामध्ये ९०४ आरोपींना अटक झाली आहे. यात महसूल, पोलिस विभागाची आघाडी कायम आहे. यामध्ये ६१ क्लास वन अधिकारी अडकले. यामध्ये क्लास थ्रीचे सर्वाधिक ४३४ कर्मचारी अडकले.
१ जानेवारी २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान लाचखोरीच्या जाळ्यात अडकूनही प्रशासन निलंबनाच्या कारवाईसाठी गांभीर्य नसल्याचे दिसून आले. यामध्ये क्लास वन (३६), क्लास टू (३६), क्लास थ्री (१२५) आणि क्लास फोरच्या १२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक मुंबई (४७), ठाणे (४३), पुणे (२३), नाशिक (२२), नागपूर (१४), अमरावती (१४), छत्रपती (२८), नांदेड (११) अधिकाऱ्यांचे अद्याप निलंबन संभाजीनगर झालेले नाही.
साहेब नामानिराळे, कर्मचारी अडकले
अनेकदा साहेबांच्या आदेशाने पैशांची वसुली होते. मात्र, साहेब बाजूला राहून कर्मचारीच अडकताना दिसत आहे. गेल्या वर्षभरात क्लास श्रीचे सर्वाधिक कर्मचारी यामध्ये अडकले आहेत.
यापूर्वीच्या कारवाया
माझगाव दिवाणी सत्र न्यायालयातील लिपिक चंद्रकांत वासुदेव याला एसीबीने १५ लाखांची लाच स्वीकारताना अटक केली. रक्कम अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन काझी यांच्यासाठी असल्याचे उघड झाले. दोघांवर गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरू आहे. यापूर्वी साताऱ्यातही न्यायाधीश लाच प्रकरणात जाळ्यात अडकले होते.
शिक्षा होऊनही बडतर्फ नाही
लाचखोरीत शिक्षा होऊनही १९ जणांवर वरिष्ठच्या कृपाशीर्वादाने बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली नाही.
फलक केवळ नावापुरता
लाच घेणे व देणे गुन्हा असा फलक शासकीय कार्यालयात नावालाच असल्याचे कारवाईतून स्पष्ट होते. शिक्षण विभागात सर्वाधिक लाचखोर सापळा कारवाईत अडकूनही शिक्षण विभागातील सर्वाधिक ४८ अधिकारी अजूनही खुर्चीत असून, कारवाईसाठी प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. त्यापाठोपाठ नगरविकास (३६), महसूल (३१) आणि पोलीस (२६) विभागाचा क्रमांक लागतो.