Mumbai Fire: जोगेश्वरीमध्ये अग्नितांडव! जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग, अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 12:31 IST2025-10-23T12:31:13+5:302025-10-23T12:31:58+5:30
Mumbai Jogeshwari Fire: जोगेश्वरी पश्चिम परिसरात एका व्यावसायिक इमारतीत मोठी आग लागल्याने परिसरात एकच घबराट पसरली.

Mumbai Fire: जोगेश्वरीमध्ये अग्नितांडव! जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग, अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु
Jogeshwari Fire: दिवाळीच्या सणासुदीच्या काळात मुंबईतआगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असता जोगेश्वरीमध्ये पुन्हा आग लागली आहे. नवी मुंबईतील दोन मोठ्या दुर्घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, गुरुवारी जोगेश्वरी पश्चिम येथील जेएमएस बिझनेस सेंटर या व्यावसायिक इमारतीत भीषण आग लागली आहे. या आगीमुळे इमारतीच्या वरच्या मजल्यांवर अनेक लोक अडकल्याचे दिसत असून, मुंबई अग्निशमन दलाने ही आग 'लेव्हल-२' ची म्हणून घोषित केली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
एस. व्ही. रोडवरील बेहरामपाडा येथील गांधी शाळेजवळील उंच इमारतीला आग लागली. आग लागल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाला सकाळी १०:५१ मिनिटांनी देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाची वाहने, स्थानिक पोलीस, १०८ रुग्णवाहिका, पीडब्ल्यूडी पथक, महापालिकेचे प्रभाग कर्मचारी आणि वीज वितरण कंपनीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि अग्निशमन दलाने इमारतीत अडकलेल्यांची सुटका केली आहे.
दिवाळीतील आगीच्या घटना: सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू
गेल्या काही दिवसांत, विशेषतः दिवाळीच्या मध्यरात्रीनंतर, नवी मुंबईत झालेल्या दोन भीषण आगीच्या घटनांनी मोठी जीवितहानी झाली आहे. वाशी सेक्टर १४ येथील 'रहेजा रेसिडेन्सी' या १२ मजली इमारतीच्या दहाव्या मजल्यावर सोमवारी मध्यरात्री आग लागली. ही आग ११ व्या आणि १२ व्या मजल्यांपर्यंत पसरली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सदस्य तसेच एका ६ वर्षांच्या चिमुरडीसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वाशीतील घटनेच्या काही तासांतच कामोठे सेक्टर ३६ मधील 'अंबे श्रद्धा' इमारतीत सिलिंडर स्फोटामुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत मायलेकीचा होरपळून मृत्यू झाला. यानंतर जोगेश्वरीच्या व्यावसायिक इमारतीला लागलेल्या या मोठ्या आगीमुळे मुंबईतही पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. अग्निशमन दलाचे जवान अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.