शिवस्मारकाच्या रचनेत मोठा बदल होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 10:37 IST2019-02-06T10:14:56+5:302019-02-06T10:37:45+5:30
शिवाजी महाराजांचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याप्रमाणे उभारला जाण्याची शक्यता

शिवस्मारकाच्या रचनेत मोठा बदल होणार?
मुंबई: अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या रचनेत मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याप्रमाणे उभा पुतळा तयार करण्याचा विचार शिवस्मारक समितीकडून सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा 153 मीटर उंचीचा असू शकतो. शिवस्मारकाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्या शिवस्मारकाचं काम बंद आहे.
राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेलं शिवस्मारक कोर्टकज्ज्यात रखडलं आहे. एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं शिवस्मारकाच्या उभारणीला औपचारिक स्थगिती दिली नसली, तरी या प्रकल्पाचं काम सुरू करू नका, असे स्पष्ट तोंडी निर्देश दिले आहेत. गेल्याच महिन्यात न्यायालयानं हे आदेश दिले. शिवस्मारकाच्या रचनेला अद्याप तांत्रिक समितीची मंजुरी मिळालेली नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वारुढ असेल, अशी चर्चा होती. मात्र आता शिवस्मारक समितीसमोर तीन ते चार पर्याय आहेत. यातील एक पर्याय उभ्या पुतळ्याचा आहे. सरदार पटेल यांच्या पुतळ्याप्रमाणे हा उभा पुतळा असेल. त्याची उंची 153 मीटर इतकी असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. गुजरातमध्ये उभारण्यात आलेला सरदार पटेल यांचा पुतळा 152 मीटर उंचीचा आहे.