Air India Plane Overshoots Runway: सोमवारी सकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक भीषण अपघात टळला. मुसळधार पावसात कोचीहून येणारे एअर इंडियाचे विमान मुंबईविमानतळावर धावपट्टीवरून घसरले. तपासणीसाठी विमान ग्राउंड करण्यात आले. विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले असून सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरुप असल्याचे विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. मात्र या अपघाताचे फोटो समोर आले असून विमानाचे तिन्ही टायर फुटल्याचे म्हटलं जात आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी सकाळी मुसळधार पावसामुळे कोचीहून येणारे एअर इंडियाचे विमान AI2744 धावपट्टीवरून घसरले. एअरबस A320 विमान धावपट्टी २७ वरून घसरले आणि नंतर टॅक्सीवेवर थांबले. विमानाला किरकोळ नुकसान झालं असलं तरी ते पूर्णपणे कार्यरत होते आणि पार्किंग बेमध्ये सुरक्षितपणे नेण्यात आले. नुकसानीमुळे रनवे २७ काही काळासाठी बंद ठेवण्यात आला. मुंबई विमानतळाच्या धावपट्टी ०९/२७ ला नुकसान झाले आहे, त्यामुळे धावपट्टी १४/३२ ऑपरेशनसाठी सक्रिय करण्यात आल्याचे विमानतळाच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं.
लँडिंग दरम्यान विमान धावपट्टीवरून १६ ते १७ मीटर दूर गेले होते. मात्र त्यानंतर ते सुरक्षितपणे टॅक्सीवेवर थांबले. सकाळी ९:२७ वाजता विमान कोचीहून मुंबईला येत असताना ही घटना घडली. या बिघाडामुळे विमानाचे तीन टायर फुटले. या घटनेनंतर आपत्कालीन प्रतिसाद पथक घटनास्थळी पोहोचले. या घटनेत कोणताही प्रवासी किंवा कर्मचारी जखमी झाला नसल्याचे सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे, प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल विमानतळ आणि एअर इंडियाने माफी मागितली आहे.
"मुसळधार पावसामुळे, लँडिंग दरम्यान धावपट्टीवरुन पुढे गेले, पण विमान सुरक्षितपणे गेटवेवर पोहोचले आणि सर्व प्रवासी सुरक्षितपणे उतरले. विमानाला चौकशीसाठी ग्राउंड करण्यात आले आहे. प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. डीजीसीएचे तपास पथक मुंबई विमानतळावर उपस्थित आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे," असं एअर इंडियाच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं आहे.