Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
By मोरेश्वर येरम | Updated: May 13, 2025 12:47 IST2025-05-13T12:35:10+5:302025-05-13T12:47:56+5:30
Mumbai Local Accident Averted: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात (CSMT) मोठा अपघात टळला आहे.

Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
मुंबई
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात (CSMT) मोठा अपघात टळला आहे. प्लॅटफॉर्म स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन अचानक रेल्वे रुळावर कोसळली. या मशीनमध्ये इलेक्ट्रिक बॅटरींचा समावेश असतो. सुदैवाने कोणतीही मोठी घटना घडली नाही. घटना घडली त्यावेळी रेल्वे रुळावर समोरुन एक लोकलही येत होती. पण मोटरमनने प्रसंगावधान दाखवत वेळीच लोकल थांबवली आणि मोठा अनर्थ टळला आहे.
सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर नेहमीप्रमाणे प्लॅटफॉर्म स्वच्छ करण्याचं काम सुरू होतं. प्लॅटफॉर्म स्वच्छ करण्यासाठी ज्या मशीनचा वापर केला जातो ती प्लॅटफॉर्मवरुन थेट रेल्वे रुळावर कोसळली. घटनेनंतर रेल्वे पोलीस तातडीनं दाखल झाले आणि मशीन हटवली गेली. घटना घडली त्यावेळी लोकलही समोरुन येत होती. मोटरमननं वेळीच लोकल रोखल्यामुळे अपघात टळला आहे.
सीएसएमटी हे मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे. दररोज या स्थानकातून लाखोंच्या संख्येनं लोक प्रवास करतात. त्यामुळे या स्थानकात नेहमी गर्दी असते. या घटनेमुळे प्लॅटफॉर्म ७ वरील सेवा काही वेळ थांबवावी लागली होती. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.