Mahrashtra Election 2019: In these constituencies, the coalition's 'Chit Bhi Meri, Pat Bhi Meri'! | Maharashtra Election 2019: ‘या’ मतदारसंघांमध्ये युतीची ‘चित भी मेरी, पट भी मेरी!’

Maharashtra Election 2019: ‘या’ मतदारसंघांमध्ये युतीची ‘चित भी मेरी, पट भी मेरी!’

मुंबई : राज्यातील काही मतदारसंघांमध्ये अशी परिस्थिती आहे की ज्यांच्यात चुरस आहे अशा दोन उमेदवारांपैकी कोणीही जिंकले तरी महायुतीच्याच पारड्यात जागा पडेल.

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघात विद्यमान आमदार अपक्ष रवि राणा विरुद्ध शिवसेनेच्या प्रीती बंड यांच्यात मुख्य लढत आहे. राणा २०१४ मध्येही अपक्ष निवडून आले आणि त्यांचा देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा होता. त्यांच्या पत्नी नवनीतकौर राणा या अमरावतीच्या खासदार आहेत. त्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी समर्थित खासदार आहेत. रवि राणा जिंकले तर ते पुन्हा एकदा फडणवीस यांच्याचसोबत जातील, असे म्हटले जाते. प्रीती बंड जिंकल्या तर महायुतीचेच संख्याबळ वाढणार आहे.

सातारा जिल्ह्यातील माण खटाव मतदारसंघात काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केलेले जयकुमार गोरे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांचे सख्खे भाऊ शिवसेनेचे उमेदवार आहेत. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हेही या मतदारसंघातील प्रभावी उमदेवार आहेत. देशमुख जिंकले तर ते अर्थातच राष्ट्रवादीसोबत जातील. गोरे बंधुंपैकी कोणीही जिंकले तरी जागा महायुतीच्याच खात्यात जाईल.

कणकवलीमध्ये भाजपचे नितेश राणे विरुद्ध शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सावंत असा सामना होत आहे. तेथे दोघांपैकी कोणीही जिंकले तरी महायुतीचीच जागा येईल.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदारसंघात शिवसेनेच्या रश्मी बागल अपक्ष नारायण पाटील विरुद्ध अपक्ष संजय शिंदे असा सामना आहे. तिथे कोणीही जिंकले तरी युतीसोबतच राहील, असे म्हटले जाते. संजय शिंदे हे चार महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढले आणि पराभूत झाले. शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीने आणि भाजपच्या एका प्रभावी नेत्याने त्यांच्या पाठीशी ताकद लावली. ते जिंकले तर युतीसोबतच जातील याची शंभर टक्के खात्री मात्र देता येत नाही.

सिल्लोडमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि काँग्रेसचे बंडखोर प्रभाकर पालोदकर यांच्यापैकी एक जण जिंकल्यास युतीचीच जागा राहील. तशीच परिस्थिती औरंगाबाद पश्चिममध्ये आहे. विद्यमान आमदार शिवसेनेचे संजय शिरसाट आणि भाजपचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांच्यापैकी कोणीही जिंकले तरी युतीचेच संख्याबळ वाढणार आहे.

बंडखोर, अपक्षांना संपर्क करणे भाजपकडून सुरू

च्निकालाला काही तास उरले असताना राज्यातील काही प्रभावी अपक्ष/बंडखोर उमेदवारांना संपर्क करण्याचे काम भाजपकडून सुरू करण्यात आले आहे. असे १५ हून अधिक उमेदवार निवडून येण्याची शक्यता असून ते आमदार निकालानंतर भाजपसोबत यावेत यासाठीची जबाबदारी भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्यास देण्यात आली आहे.

भाजप आणि शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठीचे आवश्यक बहुमत निश्चित मिळणार असे सर्वच एक्झिट पोलमध्ये पुढे आले आहे.
च्तरीही युतीत आपल्या जागा अधिकाधिक राहिल्या तर शिवसेनेशी सत्तावाटपाची चर्चा करताना आपल्याला वर्चस्व राखता यावे यासाठी अपक्षांना आपल्या तंबूत आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mahrashtra Election 2019: In these constituencies, the coalition's 'Chit Bhi Meri, Pat Bhi Meri'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.