"महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये, नाहीतर आम्ही त्यांना..."; ठाकरेंच्या मुलाखतीनंतर भाजपाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 18:07 IST2026-01-08T18:05:14+5:302026-01-08T18:07:59+5:30
महापालिका निवडणुकीच्या गदारोळात महेश मांजरेकर चर्चेत आले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीत महेश मांजेकरांनी काही मुद्दे उपस्थित करत ठाकरे बंधूंना प्रश्न विचारले. त्यावर आता भाजपाची प्रतिक्रिया आली आहे.

"महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये, नाहीतर आम्ही त्यांना..."; ठाकरेंच्या मुलाखतीनंतर भाजपाचा इशारा
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत झाली. खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ठाकरे बंधूंची मुलाखत घेतली. या मुलाखतीत मांजरेकरांनी मुंबईकर म्हणून काही मुद्द्यांबद्दल चिंता व्यक्त करत प्रश्न विचारले. महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीतील सहभागावरून आता भाजपाने इशारा दिला आहे.
महेश मांजरेकर यांनी मुलाखतीत मुंबईतील अतिगर्दीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांबद्दल प्रश्न विचारले. त्यांनी काही अनुभवही सांगितले. याच मुद्द्यावरून भाजपाचे नेते आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मांजरेकरांना सुनावले.
मांजरेकरांना सडतोड प्रत्युत्तर देऊ
आशिष शेलार म्हणाले, "महेश मांजरेकर हे एखाद्या पक्षाचा प्रचार करत असतील, तर आमचं काही म्हणणं नाही. पण ते अभिनेता म्हणून आपण निष्पक्ष आहोत, असे दाखवून एखाद्या पक्षाचा प्रचार करणार असतील, तर मांजरेकरांनाही सडेतोड प्रत्युत्तर देऊ."
मांजरेकरांच्या मुंबईतील कोंडीबद्दलच्या मुद्द्यावर शेलार म्हणाले, "त्यांनी (महेश मांजरेकर) अटल सेतू आणि कोस्टल रोडने प्रवास केला नाही का? त्यांना उपनगरीय रेल्वेतून फिरण्याची माहिती आहे का? ते अॅक्वा मेट्रोतून फिरले आहेत का? त्यामुळे महेश मांजरेकरांनी राजकारणात पडू नये आणि पडायचंच असेल, त्यांना आम्ही दाखवू आता थांबायचं नाय", असा इशारा शेलारांनी दिला.
मांजरेकर नेमकं काय म्हणाले?
'एक मुंबईकर म्हणून जेव्हा मी घराबाहेर पडतो, तेव्हा मला लाज वाटते की, माझी मुले या शहरात वाढणार आहेत. मी काही गोष्टी दररोज करतो. आजच्या प्रदूषित हवेचा निर्देशांक १८३ इतका आहे', असे सांगत मांजरेकरांनी ठाकरे बंधूंना प्रश्न विचारला होता.