'Maherghar' scheme is effective in tribal areas; more than 3 thousand delivery was successful | आदिवासी भागात ‘माहेरघर’ योजना प्रभावी; 3 हजार बाळंतपण झाले सुरक्षित
आदिवासी भागात ‘माहेरघर’ योजना प्रभावी; 3 हजार बाळंतपण झाले सुरक्षित

ठळक मुद्देमाहेरघर योजनेमुळं दुर्गम भागात संस्थात्मक बाळंतपणात वाढ माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी ही योजना प्रभावीआदिवासी, डोंगराळ भागातील 90 आरोग्य संस्थांमध्ये ही सेवा सुरू

मुंबई : राज्यातील आदिवासी आणि दुर्गम डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी ‘माहेरघर’ योजना आधार ठरत आहे. पालघर, नंदुरबार, नाशिक, नांदेड, यवतमाळ, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या नऊ जिल्ह्यातील 90 प्राथमिक आरोग्य केंद्रात ही योजना सुरू आहे. वर्षभरात सुमारे 3 हजारांहून अधिक महिलांचे ‘माहेरघर’मुळे सुरक्षित बाळंतपण करण्यात आले. संस्थात्मक बाळंतपणात वाढ होऊन आदिवासी भागातील माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी योजना लाभदायक ठरत आहे.

दुर्गम भागात अवघड रस्ते असल्याने बाळंतपणासाठी गर्भवतींना वेळेवर आरोग्य संस्थांमध्ये पोहोचणे काहीसे जिकीरीचे बनते. त्यामुळे प्रसुतीच्या चार ते पाच दिवस आधी गर्भवतींना आरोग्य संस्थांमध्ये दाखल केले जाते. त्यांना माहेरघर योजनेतून सर्वंकष सेवा दिली जाते. राष्ट्रीय आरोग्य अभियानंतर्गत सध्या आदिवासी, डोंगराळ भागातील 90 आरोग्य संस्थांमध्ये ही सेवा सुरू आहे.

ठाणे परिमंडळातील पालघर जिल्ह्यातील 13 आरोग्य संस्थांमध्ये योजना सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात दोन, नंदूरबार जिल्ह्यातील 10 आरोग्य संस्थांमध्ये तर लातूर परिमंडळातील नांदेड जिल्ह्यातील तीन आरोग्य संस्थांमध्ये ही योजना कार्यरत आहे. अकोला परिमंडळातील यवतमाळ जिल्ह्यात दोन तर अमरावती जिल्ह्यात नऊ आरोग्य संस्थांमध्ये योजना कार्यान्वीत आहे. गोंदिया जिल्ह्यात 13, चंद्रपूर जिल्ह्यात सात तर गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 31 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये योजना सुरू आहे.

माहेरघर योजनेमुळं दुर्गम भागात संस्थात्मक बाळंतपणात वाढ - आरोग्यमंत्री

माहेरघर योजना आदिवासी भागातील गर्भवतींसाठी लाभदायक ठरत आहे. राज्य शासन मातामृत्यू रोखण्यासाठी जे प्रयत्न करीत आहे त्यासाठी ही योजना सहाय्यभूत ठरत आहे. दुर्गम भागात माहेरघर योजनेमुळं संस्थात्मक बाळंतपणात वाढ झाल्याने माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी ही योजना प्रभावी ठरत असल्याचे, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. योजनेंतर्गत गर्भवती महिलेस बुडीत मजुरी म्हणून प्रतिदिन 200 रुपये देण्यात येतात. दुर्गम भागात संपर्क साधनांच्या अभावामुळे रुग्णवाहिका वेळेवर बोलवणे शक्य होत नाही अशावेळी माहेरघरमुळे गर्भवतींना चार ते पाच दिवस आधीच दाखल करून घेतलं जात असल्यामुळे प्रसुतीत अडचण येत नाही, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.


Web Title: 'Maherghar' scheme is effective in tribal areas; more than 3 thousand delivery was successful
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.