महावितरणचाही आता ‘हाय अलर्ट’ जारी; विजेचे खांब, वीजतारा तयार ठेवण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 08:07 IST2025-05-24T08:07:37+5:302025-05-24T08:07:37+5:30
अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यभरात तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महावितरणचाही आता ‘हाय अलर्ट’ जारी; विजेचे खांब, वीजतारा तयार ठेवण्याचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यभरात तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने यंत्रणेसाठी ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासूनच महावितरणचे मुख्यालय व राज्यातील अन्य ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षांचे कामकाज सुरू झाले आहे.
आपत्कालीन नियोजनानुसार प्रत्येक परिमंडल स्तरावर विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर, वीजतारांसह इतर यंत्रसामग्री उपलब्ध ठेवावी, दुरुस्तीसाठी अभियंते, कर्मचारी, तसेच सर्व एजन्सींनी मनुष्यबळ, वाहनांसह युद्धपातळीवर तयार राहावे, असे आदेश महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी दिले आहेत.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या परिस्थितीत सुरळीत वीजपुरवठ्याच्या उपाययोजनांबाबत लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी आढावा घेतला.
हयगय खपवून घेतली जाणार नाही
सध्या खंडित वीजपुरवठ्याच्या कालावधीबाबत मुख्यालयाकडून पाहणी करण्यात येत आहे. शक्य असूनही वीजपुरवठा वेळेत सुरू झाला नाही, तर त्याची गंभीर दखल घेण्यात येईल. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी क्षेत्रीय वरिष्ठ अभियंत्यांनी मोठ्या व गंभीर बिघाडाच्या ठिकाणी स्वतः जाऊन दुरुस्ती कामांना वेग द्यावा. दुरुस्ती कामाला वेळ लागणार असेल तर त्याबाबत संबंधित ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे, व्हॉटस्ॲप, ट्वीटर व सोशल मीडियाद्वारे कळविण्यात यावे.