...तर बिल्डरला ग्राहकासोबत घर विक्रीचं अॅग्रीमेंट करणं बंधनकारक, 'महारेरा'ची मार्गदर्शक सूचना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:45 IST2025-01-28T11:42:26+5:302025-01-28T11:45:40+5:30
महारेराने (Maharera) घर खरेदीदारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

...तर बिल्डरला ग्राहकासोबत घर विक्रीचं अॅग्रीमेंट करणं बंधनकारक, 'महारेरा'ची मार्गदर्शक सूचना!
महारेराने (Maharera) घर खरेदीदारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार ग्राहक एकूण रकमेपैकी १० टक्क्यांपर्यंत रक्कम देऊन घरखरेदी, घर नोंदणी करत असल्यास बिल्डरला घर विक्री करार करणे बंधनकारक आहे. बिल्डर तसे करत नसेल तर महारेराकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन महारेराने केले आहे.
घर खरेदीदाराने प्रत्यक्ष व्यवहारापूर्वी काही गोष्टींची खात्री करुन घेणे अत्यावश्यक आहे. यात गृहनिर्माण प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत असायला हवा. शिवाय प्रकल्पावर न्यायालयात खटले प्रलंबित आहेत का? असल्यास कुठले? त्याची सद्यस्थिती काय? त्याचा तपशील काय? प्रकल्पाला सीसी किती मजल्यांसाठी आहे. स्थानिक नियोजन प्राधिकरणाने प्रकल्प आराखड्याला मंजुरी दिली आहे का? या सर्व बाबींचा या सूचनांमध्ये समावेश आहे.
नोंदणी केल्याचे पत्र हे महारेराच्या मसुद्यानुसार हवे
घरखरेदीदार आणि बिल्डर यांच्यातील घर विक्री करार आणि घर नोंदणी केल्याचे पत्र हे महारेराच्या मसुद्यानुसारच द्यावे, असे बंधन बिल्डरवर आहे. बिल्डरने घर खरेदीकरारात आणि नोंदणीपत्रात स्वतंत्र जोडपत्रात पार्किंग आणि सुविधांचा तपशील देणे बंधनकारक आहे.
महारेरा नोंदणीकृत प्रकल्पाची वैशिष्ट्ये
१. घरे खरेदी/ घर नोंदणीपोटी आलेल्या पैशांपैकी ७० टक्के बांधकामासाठीच वापरणे बंधनकारक आहे.
२. प्रकल्पाचा प्रगती अहवाल तीन महिन्याला वेबसाइटवर नोंदवणे बिल्डरला बंधनकारक आहे.
३. महारेराच्या वेबसाइटवर प्रकल्प पूर्णतेची तारीख आवश्यक आहे.
प्रकल्प पूर्ततेतील संभाव्य अडचणी लक्षात गेऊन नोंदणी क्रमांक देतानाच त्या प्रस्तावित प्रकल्पाची कायदेविषयक, आर्थिक आणि तांत्रिक छाननी काटेकोरपणे करण्यात येत आहे. प्रकल्प ज्या भूखंडावर उभा राहणार आहे त्याची मालकी, संबंधित मंजुरी, मजल्याची परवानगी अशी माहिती नोंदणी क्रमांकासाठी सादर करावी लागते. तसेच मालकी हक्काबद्दलचे वाद असल्यास त्याचीही माहिती द्यावी लागते. महारेराच्या वेबसाइटवर ही माहिती सर्वांना उपलब्ध आहे.
- मनोज सौनिक, अध्यक्ष, महारेरा