Join us

शरद पवार गटाचा पलटवार; अजित पवारांच्या पत्राला दिलं जशास तसं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 08:50 IST

अजित पवार यांनी पहिल्यांदाच पत्राद्वारे जाहीरपणे, राष्ट्रवादीची सरकारमध्ये सामील होण्यामागची भूमिका आणि पुढील वाटचालीची दिशा मांडली आहे.

मुंबई - शिवसेनेतील बंडखोरीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येहीशरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगापुढे ही लढाई सुरू झाली आहे. एकीकडे ही राजकीय लढाई सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होऊन आज १०० दिवस झाले आहेत. त्यानिमित्त राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख नेते अजित पवार यांनी जनतेला उद्देशून पत्र लिहिलं होतं. आपण घेतलेली ही भूमिका ही जनतेच्या कल्याणासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठीच असल्याचं त्यांनी पत्रातून म्हटलं होतं. आता, शरद पवार गटाकडून अजित पवारांच्या पत्रावर प्रत्युत्तर देण्यात आलंय. 

अजित पवार यांनी पहिल्यांदाच पत्राद्वारे जाहीरपणे, राष्ट्रवादीची सरकारमध्ये सामील होण्यामागची भूमिका आणि पुढील वाटचालीची दिशा मांडली आहे. वसा विकासाचा–विचार बहुजनांचा हे समाजकारणाचं सूत्र आहे. महाराष्ट्रात यापूर्वी झालेल्या राजकीय बंडाचा अप्रत्यक्ष उल्लेख करत महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात प्रत्येक मोठ्या नेत्याने वेगळी राजकीय भूमिका त्या त्या वेळेनुसार आणि काळानुसार घेतल्याचे त्यांनी पत्रातून म्हटले आहे. आता, गेल्या १०० दिवस महाराष्ट्राचा स्वाभीमान दिल्लीपुढे गहाण ठेवल्याची बोचरी टीका शरद पवार गटाने अजित पवार गटावर केली आहे.

राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अजित पवारांच्या पत्राला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ''पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन जगणारा कधीच दिल्लीच्या तख्तापुढे आपला महाराष्ट्र स्वाभिमान गहाण ठेवत नाही. जो तुम्ही गेले १०० दिवस गहाण ठेवलात... कितीही मोठं संकट आलं तरी, विचारांच्या तत्वांशी एकनिष्ठ राहून कुणापुढे न झुकतामहाराष्ट्राच्या हिताचा ध्यास अहोरात्र बाळगण्याची धमक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व शरदचंद्र पवार साहेबांमध्येच आहे,'' असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. तसेच, गेल्या १०० दिवसांत घडलेल्या घटनांचा संदर्भ देत राज्य सरकारसोबत तुम्हीही अयशस्वी व घटनांना जबाबदार असल्याचे शरद पवार गटाने म्हटलंय. 

काय म्हणाले होते अजित पवार

राजकीय वाटचालीकरिता स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या बहुजनांना सत्तेच पाठबळ देण्याच्या भूमिकेची प्रेरणा आम्ही घेतली आहे. तसेच, फुले–शाहू–आंबेडकरांच्या मार्गावरच राष्ट्रवादी पक्ष वाटचाल करणार याची ग्वाहीही अजित पवारांनी दिलीय. लोकाभिमुख राजकारण व समाजकारण तसेच सकारात्मक आणि विकासात्मक राजकारणावर भर देणार असल्याचे अजित पवार यांनी या पत्रातून म्हटलं आहे. तर, पत्राद्वारे आशीर्वाद आणि साथ देण्याचं आवाहनही त्यांनी जनतेला केलंय.   

टॅग्स :अजित पवारशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसमुंबई