Join us  

महाराष्ट्र निवडणूक निकाल : शिक्षण मंत्र्यांची फर्स्ट क्लास कामगिरी; 26,507 मतांनी विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 3:24 PM

Maharashtra Election Result 2019 : आशिष शेलार यांचा 26 हजार 507 विक्रमी मताधिक्याने विजय

मुंबई - राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार आशिष शेलार यांचा तब्बल 26 हजार 507 च्या मताधिक्याने विजय झाला आहे. एकेकाळच्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सलग दुसऱ्यांदा त्यांनी विजय मिळविला आहे.

मतदान गेल्या वेळेपेक्षा सुमारे 10 टक्के कमी झाले होते. गेल्या वेळेस 52 टक्के मतदान झाले होते. तर यावेळी या मतदारसंघात 43.97 टक्के मतदान झाले होते. एकूण 1लाख 30 हजार 900 मतदान यावेळी झाले. त्यापैकी तब्बल 74,816 मते आशिष शेलार यांना मिळाली. गेल्या वेळेस 2014च्या विधानसभा निवडणुकीत 1 लाख 46 हजार 764  मतदान झाले होते. त्यावेळी 26 हजार 657 एवढ्या मताधिक्याने आशिष शेलार विजयी झाले होते. यावेळी तुलनात्मक मतदान कमी झाले असताना ही शेलार यांचे मताधिक्य जवळपास कायम राहिले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीला जबरदस्त धक्का बसला आहे. एकीकडे राज्यात महायुतीची पिछेहाट होत असतानाच शिवसेना पक्षप्रमुखांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेला जबरदस्त धक्का बसला आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर हे पराभूत झाले आहेत. वांद्रे पूर्व मतदारसंघातून काँग्रेसचे झिशान सिद्दिकी यांनी विजय मिळवला आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. मात्र येथून तिकीट कापल्याने विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे महाडेश्वर यांना ही निवडणूक जड जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान, आज झालेल्या मतमोजणीत शिवसेना उमेदवारा विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेना बंडखोर तृप्ती सावंत यांच्यात झालेल्या मतविभागणीचा मोठा फटका महाडेश्वर यांना बसला. 

राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असल्याचं चित्र समोर येऊ लागलं आहे. भाजपा, शिवसेनेच्या जागा कमी होताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला दुहेरी धक्का बसला आहे. अब की बार 200 पारची घोषणा देणाऱ्या महायुतीला पावणे दोनशेचा आकडा गाठण्यातही अपयश येताना दिसत आहे. त्यातच फडणवीसांच्या मंत्रिमंडळातल्या पाच सहकाऱ्यांचा पराभव झाला आहे. 

 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019आशीष शेलारभाजपावांद्रे पश्चिम