Join us

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : Video - "पुन्हा एकदा..."; निकालाच्या दिवशी नेतेमंडळी सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 09:14 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : राहुल नार्वेकर, संजय निरुपम, शायना एनसी आणि महेश सावंत यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. गेल्या अडीच वर्षांतील राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी, नात्यातील दुरावा यामुळे महाराष्ट्राचं राजकारण देशभरात चर्चेचा विषय ठरलं. या पार्श्वभूमीवर, २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान झालं. राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून हे नेते आपले बालेकिल्ले टिकवून ठेवण्यात यश मिळवतात की नवे उमेदवार जायंट किलर ठरणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

निकालाच्या दिवशी सकाळीच नेतेमंडळी सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक झालेले पाहायला मिळत आहेत. राहुल नार्वेकर, संजय निरुपम, शायना एनसी आणि महेश सावंत यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. तसेच दर्शनानंतर त्यांनी निवडणूक निकालावर आणि विजयावर देखील भाष्य केलं आहे. शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांनी दर्शन घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी आशीर्वाद मागितले आहेत. 

दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय निरुपम यांनी देखील महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार स्थापन करेल असं म्हटलं आहे. "मी येथे श्रीसिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. त्याच्या आशीर्वादाने मी विजयी होईन, असा मला विश्वास आहे. माझ्याप्रमाणेच शिवसेना, भाजपा आणि अजित पवार यांच्या पक्षाचेही उमेदवार आहेत. तेही जिंकतील आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन करेल" असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माहीम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेश सावंत यांनी सिद्धिविनायक हे आमचं आराध्य दैवत आहे असं म्हटलं आहे.  माझ्या मनात काय आहे ते आपोआप मला मिळालं आहे. देवाला देखील ते माहीत आहे. मला सुरुवातीपासूनच काही आव्हानात्मक वाटलं नाही. कारण माझा संबंध हा सर्वसामान्यांशी आहे. दिवसरात्र लोकांची कोण सेवा करतं हे चाळीतील, वाडीतील सर्व लोकांना माहीत आहे असं महेश सावंत यांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४संजय निरुपममुंबईसिद्धिविनायक गणपती मंदिर