सुरेश ठमके
मुंबई - मुंबईतील ३६पैकी १६ जागा जिंकत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेली पीछेहाट भरून काढत भाजप आणि महायुतीने उद्धवसेनेला पर्यायाने महाविकास आघाडीपुढे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आव्हान उभे केले आहे.
लोकसभा निवडणुकीत मुंबईत केवळ दोन जागा जिंकता आलेल्या महायुतीने विधानसभेच्या ३६पैकी २० जागा जिंकून जोरदार कमबॅक केले आहे. भाजपने तर १६ जागांवर आपला झेंडा फडकवत २०१९मधील १६ जागांवरील विजय कायम ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अनेक ठिकाणी निसटता पराभव पत्करावा लागला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत या सर्वांची कसर भरून काढत महायुतीने गद्दार हे आरोप खोडून काढत मतदारांपर्यंत प्रभावीरीत्या आपले मुद्दे पोहोचवले. लाडकी बहीण योजना, युवा रोजगार प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना यातून थेट जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला.
तीन जागांवर पराभवभाजपने १९ जागा लढवल्या होत्या, त्यांपैकी तीन जागांवर पराभव पत्करावा लागला. यामध्ये वर्सोवा मतदारसंघात भारती लव्हेकर यांच्याबाबत असलेली नाराजी भाजपला भोवली. मालाड मतदारसंघात विनोद शेलार यांनी मात्र अस्लम शेख यांना कडवी झुंज दिली. कलिना मतदारसंघात अमरजीत सिंग यांनीही नवखा उमेदवार असून, संजय पोतनीस यांना जोरदार टक्कर दिली.
मुंबईमध्ये भाजपच्या उमेदवारांनी प्रचंड मताधिक्यांनी विजय मिळवत पुन्हा एकदा मुंबईवर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज असल्याचा इशाराच या निमित्ताने दिला आहे. शिंदेसेनेनेही चार जागांवर विजय मिळवला असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर विजय मिळवता आला. यामुळे महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, उद्धवसेनेला आपल्या अस्तित्त्वासाठी झुंजावे लागणार आहे. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत केवळ दोन जागांनी पिछाडीवर असलेल्या भाजपला रोखण्याचे आव्हान यावेळी उद्धवसेनेसमोर असेल.