ठाकरे घराण्यातील व्यक्ती प्रथमच निवडणूक रिंगणात; आदित्य यांनी स्वतः केली घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 21:44 IST2019-09-30T17:42:13+5:302019-09-30T21:44:14+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- लहानपणापासून राजकारणाची आवड आहे. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंनी प्रेम दिलं.

ठाकरे घराण्यातील व्यक्ती प्रथमच निवडणूक रिंगणात; आदित्य यांनी स्वतः केली घोषणा!
मुंबई - शिवसेनेने राजकारण केलं नाही समाजकारण केलं, लहानपणापासून राजकारणाची आवड आहे. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंनी प्रेम दिलं. ज्येष्ठ शिवसैनिकांचे आशीर्वाद लाभले, या सर्वं शिवसैनिक आणि शिवरायांच्या साक्षीने मी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करतो असं सांगत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. वरळी येथे झालेल्या विजयी संकल्प मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली. यावेळी तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, शिवसेना खासदार संजय राऊत हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गेली दोन-तीन महिने महाराष्ट्रभर फिरत होतो. ज्यांनी ज्यांनी मतदान केलं त्यांचे आशीर्वाद घेत होतो. गेली ५० वर्ष हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना जे तुम्ही प्रेम दिले हेच प्रेम तुम्ही मला देणार आहात. हेच प्रेम मी पुढे घेऊन जाणार आहे. मला जेव्हा जेव्हा कोणी विचारलं की तू काय करू शकतोस मी त्यांना उत्तर दिले की मी राजकारण करू शकतो. मला माझ्या आजोबांची शिकवण आहे की, 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण. कारण राजकारण असे एक माध्यम आहे की, तुमचा एक निर्णय कितीतरी लाखो लोकांचे भविष्य करू शकतो असं त्यांनी सांगितले.
जनतेची सेवा करण्यासाठी, सर्व जनतेचा आदेश मानत, आज मी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 30, 2019
सर्व भेदभाव दूर करुन, नवा महाराष्ट्र घडवण्याची “हीच ती वेळ” pic.twitter.com/xAEWunqk60
तसेच महाराष्ट्रभर फिरत होतो दुष्काळग्रस्त आणि पूरग्रस्त भागात फिरलो. लोकांसाठी शिवसेनेने भरपूर काम केलेले आहे. पक्षप्रमुखांची परवानगी घेतली आहे पण आपल्या सर्वांची जर परवानगी असेल आणि सर्व नेत्यांची इच्छा असेल तर मी ही निवडणूक लढवणार आज मी इथे जाहीर करतो आपले प्रेम आणि आपले आशीर्वाद सोबत आहेत कारण मी फार मोठी झेप घेत आहे असं आदित्य ठाकरेंनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रभर मी फिरतआहे जो लोकांचा आवाज माझ्यापर्यंत पोहचत नाही तो आवाज तुम्ही माझ्याकडे पोहोचवायचा आहे. वरळी विकास तर आपण करून परंतु महाराष्ट्र आपल्याला पुढे न्यायचा आहे. फक्त वरळीसाठी नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी आपल्या सर्वांना मिळून काम करायचे आहे. निवडणूक लढवायची हा निर्णय माझ्या स्वप्नांसाठी नाही आहे तर नवा महाराष्ट्र घडवायचा आहे त्यासाठी आहे. हीच ती वेळ आहे कर्जमुक्त महाराष्ट्र, प्रदूषण मुक्त महाराष्ट्र, बेरोजगारी मुक्त महाराष्ट्र हिरवागार सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवायची. शिवसेना ही पूर्ण महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा ठाणे खानदेश,पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र रायगड-कोकण सगळीकडे नेण्याची असं सांगत आदित्यने शिवसैनिकांना सर्वांनी हा तुमचा हात वर करा, पहा यात मला कुठेही भेदभाव दिसत नाही आहे हीच वेळ आहे सर्वांनी एकजुटीने एकत्र येण्याची असं आवाहन केलं.