Join us  

'सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करणार; बारामतीची जागा 1 लाखांनी निवडून आणणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 7:19 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी लढवणार आहे. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा सातारा जिल्हा आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा आणि काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अधिकृत घोषणा 2 ऑक्टोबरला करण्यात येईल. गांधी जयंतीच्या दिवशी कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या हे जाहीर करु. काट्याने काटा काढायचा असतो, सुरुवात त्यांनी केली शेवट आम्ही करणार अशा शब्दात राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी भाजपा-शिवसेनेला इशारा दिला आहे. 

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी लढवणार आहे. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा सातारा जिल्हा आहे. यशवंतरावांनंतर शरद पवारांवर या जिल्ह्याने प्रेम केले. त्यामुळे आम्ही तिथे जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच बारामतीत कोणीही उभं राहू शकतो, समोरचा उमेदवार तुल्यबळ आहे असचं समजून आम्ही निवडणूक लढवतो. गोपीचंद पडळकर, चंद्रकांत पाटील उभे राहणार असतील तर बारामतीत त्यांचे स्वागत करतो. बारामतीतील उमेदवार 1 लाखाच्या मताधिक्याने विजयी करणारच असा दावा अजित पवारांनी केला आहे. 

यावेळी पहिली यादी कधी जाहीर होणार यावर पत्रकारांनी विचारलं असता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की, लवकरच ही यादी जाहीर करु, बारामतीचा अभ्यास सुरु आहे. बारामतीत कडवी झुंज देऊ शकेल असा उमेदवार पक्ष देईल असं सांगितल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. भाजपा-शिवसेनेचा अनेकजण आमच्या संपर्कात आहे. कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आघाडीचा उमेदवार लवकर ठरवू किंवा अन्य कोणी उभं राहत असेल तर त्यांना पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं अजित पवारांनी सांगितले. 

वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी घरवापसी केली केली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ असून त्यांनी बारामती मतदार संघातून निवडणूक लढवावी, असे सांगत एकप्रकारे भाजपाकडून त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे.  

टॅग्स :अजित पवारबारामतीगोपीचंद पडळकरभाजपा