Vidhan Sabha 2019: युतीमुळे वाढणार इच्छुकांचे टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 01:31 AM2019-09-24T01:31:18+5:302019-09-24T01:31:40+5:30

गणिते बिघडण्याची चिन्हे : जोमाने कामाला लागलेल्यांची धाकधूक वाढली

Maharashtra Vidhan Sabha 2019 Tension of aspirants will increase due to the alliance | Vidhan Sabha 2019: युतीमुळे वाढणार इच्छुकांचे टेन्शन

Vidhan Sabha 2019: युतीमुळे वाढणार इच्छुकांचे टेन्शन

Next

- शेफाली परब-पंडित 

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर विधानसभेतही युतीचे सूर जुळू लागले आहेत. मात्र, शिवसेना-भाजप एकत्रित आल्यास काही मतदारसंघांतील गणिते बिघडण्याची चिन्हे आहेत. तिकीट मिळण्याच्या आशेने मतदारसंघात जोमाने कामाला लागलेल्या इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे जागा वाटपात आपला मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार याकडे त्यांचे डोळे लागले आहेत. मात्र, काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या भाजप प्रवेशामुळे वाटाघाटीत वडाळा विधानसभा मतदारसंघाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वडाळा मतदारसंघात २००५मध्ये राजकीय उलथापालट झाली. पाच वेळा निवडून आलेले आमदार कालिदास कोळंबर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००९मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. त्यामुळे शिवसेनेला या मतदारसंघावर पाणी सोडावे लागले. लोकसभा निवडणुकीच्या दणदणीत निकालानंतर, युती कायम राहिल्यास या मतदारसंघात विजय मिळण्याची शिवसेनेला खात्री होती. मात्र, कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ही जागा त्यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता वाढली आहे.

माजी महापौर व शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव या वडाळा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. यापूर्वीही त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र, कोळंबकर यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे यावेळेस पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी त्या तयार असल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र, २०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे जागा वाटपात मतदारसंघावर भाजपचा दावा असणार आहे.
जाधव या शिवसेनेच्या महिला संघटक असून, आतापर्यंत सहा वेळा नगरसेवक पदावर निवडून आल्या आहेत. मात्र, महापौरपद वगळता एकही मोठे पद त्यानंतर त्यांच्या वाट्याला आलेले नाही. यावेळेस त्यांना आमदारकीचे तिकीट मिळावे, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतु जाधव यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गच काहींनी विरोधाचा सूर लावला आहे. त्यामुळे ही जागा मिळविण्यासाठी शिवसेना अडून बसणार का? याविषयी उत्सुकता वाढली आहे.

मतदारसंघावर दृष्टिक्षेप
२००९मध्ये विधान सभा निवडणुकीत कालिदास कोळंबकर हे ३० हजार मताधिक्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.
२०१४मध्ये मोदी लाट असताना ते ८०० मतांच्या फरकाने निवडून आले होते, तर यापूर्वी पाच वेळा ते शिवसेनेतून आमदारपदी निवडून आले आहेत.
वडाळा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा आहे. मात्र, युती झाल्यास भाजपतून कोळंबकर हक्क सांगण्याची शक्यता आहे.
२०१४ विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार येथे दुसºया क्रमांकावर होता. त्यामुळे ही जागा युतीसाठी अडचणीची ठरेल. या मतदारसंघात शिवसेनेचे चार ते काँग्रेसचे दोन नगरसेवक आहेत.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Tension of aspirants will increase due to the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.