Join us  

Vidhan Sabha 2019: भाजपचा मुख्यमंत्री पुन्हा होणार हे मात्र ठरले हो; शेलारांचा शिवसेनेला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 8:24 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने शिवसेनेशी जुळवून घेत युती करण्याचे जाहीर केले. त्यावेळी पत्रकार परिषदेत सत्तेत शिवसेनेचा समसमान वाटा राहील असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

मुंबई - शिवसेना-भाजपा यांच्यातील युतीबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. 100 टक्के युती होईल असं दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत असले तरी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी भाजपा-शिवसेना सोडत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई शाह दोघेही येऊन जेव्हा जेव्हा प्रचाराची सुरुवात करतात. छत्रपतींच्या या महाराष्ट्रात निवडणुकीत भाजपाच्या विजयाचेच झेंडे फडकतात. त्यामुळे कुछ होवो न होवो भाजपचा मुख्यमंत्री पुन्हा होणार हे मात्र ठरले हो अशा शब्दात आशिष शेलारांनी नाव ने घेता शिवसेनेला टोला लगावला आहे. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने शिवसेनेशी जुळवून घेत युती करण्याचे जाहीर केले. त्यावेळी पत्रकार परिषदेत सत्तेत शिवसेनेचा समसमान वाटा राहील असं वक्तव्य मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानंतर अनेकदा मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने जाहीररित्या इच्छा व्यक्त करून दाखविली होती. शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यातही स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी व्यासपीठावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम असल्याचं विधान केलं होतं. तर याच कार्यक्रमाच्यापूर्वी सामना अग्रलेखातून पुढील वर्धापनदिनी मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल असं विधान केलं होतं. त्यामुळे राज्यातील सत्तेच्या वाट्यात मुख्यमंत्रीपद मिळावं ही शिवसेनेची इच्छा वारंवार समोर आली आहे. 

दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपाला मिळालेलं यश पाहताने भाजपाने शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी पुन्हा येईन असं देवेंद्र फडणवीसांनी सांगून पुढील मुख्यमंत्री मीच असणार यात शंका नाही असा दावा केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्यात बहुमत नसताना स्थिर सरकार देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यामुळे पुन्हा देवेंद्र यांना बहुमत देऊन सरकार आणावं असं सांगून एकप्रकारे शिवसेनेला डिवचण्याचं काम केलं. रविवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही राज्यातील पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असतील यावर शिक्कामोर्तब केलं आहे. 

तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरे योग्य आहेत. ते महाराष्ट्राला दिशा देऊ शकतात असं सांगत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनविलं आहे. सध्या राजकारणात आदित्य ठाकरे जनआशीर्वादच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात लोकांना भेटत होते. ठिकठिकाणी स्थानिक लोकांशी संवाद साधून प्रचाराचा धुमधडाका लावला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे उभे राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद असो वा सत्तेतला वाटा यामध्ये नेमकं काय ठरलं आहे याबाबत युतीचे सर्वोच्च नेतेच सांगू शकतात. तुर्तास युतीबाबत कोणतीच घोषणा न झाल्याने सर्वांच्या मनात संभ्रम अद्यापही कायम आहे.   

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसशिवसेनाभाजपामुख्यमंत्री