Join us  

Vidhan Sabha 2019: 'हे' तर कोट्याधीश जादूगर! भाजपाच्या 'रम्या'ने दिला राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 1:29 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - रम्याचे डोस या भागात भाजपाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुन्हा डिवचण्याचं काम केलं आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्यानंतर राज्यात प्रचाराची रणधुमाळी उडाल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी राजकीय पक्ष सोडत नसल्याचं दिसत आहे. यात आघाडी घेतली आहे ती सत्ताधारी भाजपा पक्षाने. भारतीय जनता पार्टीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रम्या नावाचं काल्पनिक पात्र उभं केलं आहे. त्यामाध्यमातून विरोधकांवर निशाणा साधण्याचं काम भाजपा करतंय. 

रम्याचे डोस या भागात भाजपाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुन्हा डिवचण्याचं काम केलं आहे. कोहिनूरमधील कथित घोटाळ्याच्या आरोपावरुन राज ठाकरे यांची ईडी चौकशी करण्यात आली होती. या घटनेचा संदर्भ देत भाजपाने राज ठाकरेंना चिमटा काढला आहे. यात रम्याला एक जण सांगतो की, काल मी जादूचे प्रयोग बघितले, त्या जादुगाराने 2 रुपयांचे नाणे एका रिकाम्या डब्यात ठेवलं आणि दोन सेकंदात त्या नाण्याची 2000 रुपयांची नोट झालेली दिसली, आम्ही बघतच राहिलो असं सांगताच रम्याने त्याला सांगितले त्यात काय मोठं आपल्या कृष्णकुंजवरच्या सायबांनी एकही रुपया न टाकता 20 कोटी काढून दाखवले असं सांगत अप्रत्यक्षरित्या राज ठाकरेंना टोला लगावला आहे. 

तसेच रम्याच्या या म्हणण्यावरुन भाजपाने महाराष्ट्रातही असे जादूचे प्रयोग करणारे साहेब एकमेव कोहिनुर आहेत असं सांगून राज ठाकरेंना डिवचण्याचं काम केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा यांच्यातील आरोप-प्रत्यारोप लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रंगत आहे. लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडिओमुळे भाजपाची कोंडी झाली होती. अनेक जाहिरातींची पोलखोल करणारे राज यांच्या व्हिडिओमुळे प्रचारात रंगत आली होती. 

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्याविरोधात भाजपाने ही सोंगटी कोणत्या चौकटीत जाणार असं सांगत राज ठाकरेंवर निशाणा साधला होता तर यालाच प्रत्युत्तर देत मनसेनेही राजभाषेच्या चाहुलीने यांचे पाय लटपटले असं सांगत भाजपाला टोला लगावला होता. त्यामुळे राज ठाकरे आणि भाजपा यांच्यातील वाकयुद्ध दिवसेंदिवस वाढत जाणार यात शंका नाही.    

टॅग्स :राज ठाकरेमनसेअंमलबजावणी संचालनालयमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019