Join us  

युती जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेकडून एबी फॉर्म वाटप; 'या' 9 उमेदवारांना उद्धव ठाकरेंनी दिली संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 6:03 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिवसेना-भाजपा युती कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्म वाटप झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र तत्पूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिवसेना-भाजपा युती कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्म वाटप झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. 

घटस्थापनेचा मुहुर्त साधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघातून संजय शिरसाट, कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विद्यमान आमदार तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना संधी देण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील सहा विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. कागलमधून संजय बाबा घाडगे, चंदगडवरुन संग्राम कुपेकर, करवीरमधून आमदार चंद्रदीप नरके, हातकणंगलेमधून डॉ. सुजित मिणचेकर, शाहुवाडी सत्यजीत पाटील, राधानगरीतून प्रकाश आबिटकर, शिरुळमधून उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

कोल्हापुरात एकूण 10 जागा आहेत. त्यातील सहा शिवसेनेकडे, 2 राष्ट्रवादी, 2 भाजपाकडे आहे. तसेच कोल्हापूरसह रत्नागिरी - दापोली मतदार संघात शिवसेनेकडून योगेश रामदास कदम यांना उमेदवारीचा एबी फॉर्म देण्यात आलेला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधकांना रामदास कदम यांचा धक्का असल्याचं बोललं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा 144 जागा, मित्रपक्ष 18 तर उर्वरित 126 जागा शिवसेना लढवणार असल्याचं निश्चित झालं असल्याची सूत्रांची माहिती आहे. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी जागावाटपावर सहमत न झाल्याने दोन्ही पक्षाची 25 वर्षाची युती तुटली होती. 

शिवसेना-भाजपा युतीमधील मित्रपक्षांच्या वाट्याला भाजपा 162 मधील जागा देणार आहे. मात्र या मित्रपक्षांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर लढण्यासाठी दबाव टाकला जाणार असल्याची माहिती आहे. जागावाटपाबाबत आणि युतीची घोषणा येत्या एक-दोन दिवसांत जाहीर होणार असल्याची माहिती एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाभाजपामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019