“येत्या ५ वर्षांत सर्व महानगरांमध्ये मुंबई आघाडीवर असेल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 09:45 PM2024-02-19T21:45:54+5:302024-02-19T21:48:47+5:30

लोकमत मीडियाचे संपादकीय संचालक आणि सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विशेष संवाद साधला.

maharashtra state dcm devendra fadnavis said that mumbai will leapfrog by five years ahead of all megapolises soon | “येत्या ५ वर्षांत सर्व महानगरांमध्ये मुंबई आघाडीवर असेल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास

“येत्या ५ वर्षांत सर्व महानगरांमध्ये मुंबई आघाडीवर असेल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास

मुंबई: ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा तसेच प्रकल्पांची उभारणी केली जात आहे, ते पाहता येत्या पाच वर्षांत मुंबई सर्व महानगरांच्या पुढे असेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘टेक एंटरप्रेन्युअर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. लोकमत मीडियाचे संपादकीय संचालक आणि सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईबाबतचे व्हिजन आणि संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात कशी येईल, याबाबत सविस्तर माहिती दिली. 

या कार्यक्रमात संवाद साधताना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, सन २०१४ मध्ये जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा उद्योजक आणि व्यावसायिकांशी बोलताना एक गोष्ट जाणवली की, न परवडणारे शहर, गजबजाट आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा अभाव, अशी मुंबईची ओळख बनली आहे. याबाबतही दोन मते निदर्शनास आली. एक म्हणजे हळूहळू गुंतवणूक करावी आणि दुसरे म्हणजे गतीने प्रगती व्हावी. आम्ही दुसऱ्या पर्यायावर जाण्याचा निर्णय घेतला. सन २०१५ ते २०१९ या कालावधीत ३० बिलियन डॉलर्सचे प्रकल्प सुरू करण्यात आले, असे सांगत अलीकडेच सुरू करण्यात आलेला २२ किमीचा अटल सेतू मुंबईचा कायापालट करणारा ठरेल, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आम्ही मुंबईभोवती एक कॉरिडॉर बनवत आहोत. आपल्याकडे मुंबईत आता वांद्रे वरळी सी लिंक आहे, वरळी ते नरिमन पॉइंटला जोडणारा कोस्टल रोड आहे, वांद्रे ते वर्सोवा, पश्चिमेला उत्तन ते विरारपर्यंत कनेक्टिव्हिटी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अटल सेतूसह अलिबागला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशात एका बाजूने दुसऱ्या बाजूला केवळ ५९ मिनिटांत जाऊ शकतो, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

मुंबई मेट्रो प्रकल्पाबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकूण ३७५ किमी मेट्रो नेटवर्कची संकल्पना सुरुवातीला मांडण्यात आली होती. त्यापैकी ५० किमी आधीच कार्यान्वित करण्यात आले होते. तर ५० किमी अंतर हे लवकरच मेट्रोने जोडण्यात येईल. त्यानंतरच्या सहा महिन्यांत पुढील ५० किमी अंतरावर मेट्रो कार्यान्वित केली जाईल. याची तुलना ११ वर्षात बांधलेल्या ११ किमी मेट्रो मार्गाशी केली जाऊ शकते. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमधून दररोज अंदाजे ९ मिलियन प्रवासी प्रवास करतात. मुंबई मेट्रो प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर आणखी ९ मिलियन प्रवासी प्रवास करू शकतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तत्पूर्वी, देशात सर्वाधिक स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न महाराष्ट्रात आहेत, असे देवेंद्र फडणवीस नुकत्याच झालेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कार सोहळ्यात सांगितले होते.

बंगळुरू किंवा हैदराबादप्रमाणे मोठे टेक पार्क मुंबई किंवा महाराष्ट्रात आल्याचे पाहायला मिळत नाही. तसेच आपल्याकडे स्टार्टअप्स आणि युनिकॉर्नची संख्या सर्वाधिक असूनही उद्यमी भांडवल नेहमीच बेंगळुरू आणि हैदराबादला जाते, असे का? असा प्रश्न ऋषी दर्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना, येत्या काही वर्षांत यात लवकरच बदल होताना दिसतील. नवी मुंबईत ॲमेझॉनने सर्वांत मोठ्या डेटा सेंटरपैकी एकामध्ये गुंतवणूक केली आहे. गुगलने पुण्यात कार्यालय सुरू केले आहे. एका AI प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. आणखी तीन ते चार जागतिक स्तरावरील दिग्गज कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. त्यांची नावे आताच उघड करू शकत नाही, याचे कारण आपल्याकडे प्रचंड स्पर्धा आहे. पण भविष्यात आणखी काही गोष्टी लवकरच दिसून येतील. कंपन्यांना फक्त सुशासन हवे आहे आणि आम्ही ते पुरवत आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

सुशासन आणि तंत्रज्ञानाचा वापर याबाबत सविस्तरपणे सांगावे, अशी विनंती ऋषी दर्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी शिष्यवृत्ती घोटाळ्याचे उदाहरण दिले आणि सांगितले की, आम्हाला आढळले की पैसे चुकीच्या खात्यात जात आहेत. आम्ही आधार लिंक करून घेतले आणि मग पैसे फक्त विद्यार्थ्यांकडे जाऊ लागले. ते फी भरत नाही आणि पैसे इतरत्र खर्च करतात, अशी तक्रार मुख्याध्यापकांनी केली. त्यामुळे आम्ही स्टुडंट्स वॉलेट तयार केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळालेले पैसे केवळ महाविद्यालयांना पाठवता येऊ शकत होते. यामुळे शिष्यवृत्ती घोटाळ्यातील १०० टक्के भ्रष्टाचार संपला. हीच पारदर्शकता तंत्रज्ञानामुळे शक्य झाली. आमच्या सर्व योजना पीएम-मोबाइल, आधार आणि थेट लाभ हस्तांतरण या तीन गोष्टींच्या माध्यमातून राबवल्या जातात, असे देवेद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: maharashtra state dcm devendra fadnavis said that mumbai will leapfrog by five years ahead of all megapolises soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.