Join us  

SSC HSC Exams : दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय होणार? मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार शिक्षणमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 2:40 PM

SSC HSC Exams: इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत इयत्ता नववी आणि अकरावीच्या परीक्षांसंदर्भात उद्या निर्णय घेण्यात येणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे.

SSC HSC Exams: इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी आज महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत इयत्ता नववी आणि अकरावीच्या परीक्षांसंदर्भात उद्या निर्णय घेण्यात येणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे. तर दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन येत्या पाच ते सहा दिवसात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय जाहीर केला जाईल, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शालेय शिक्षण विभागानं तयारी केल्याचं बोललं जात आहे. 

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा नेमक्या कशा घेतल्या जाणार असा प्रश्न सर्वानांच पडला आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता थेट पास केलं जाणार असल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी याआधीच केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज पत्रकार परिषदेत इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षाविना पास करण्यात यावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं सांगितलं आहे. 

राज्यात सध्या ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने अशा काळात परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी त्रास होऊ शकतो. ऐनवेळी परीक्षा केंद्रांवर मोठा गोंधळही निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेता इयत्ता दहावी आणि बारावी संदर्भात राज्य सरकार येत्या काही दिवसांत मोठा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

दहावी-बारावीच्या वेळापत्रकाचं काय?इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक याआधीच जारी करण्यात आलं आहे. येत्या पाच ते सहा दिवसांत विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रमोट करण्यासंदर्भात कोणताही निर्णय न झाल्यास जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसारच लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यात इयत्ता १० वीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मेच्या दरम्यान होईल. तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान घेतली जाणार आहे.  

टॅग्स :वर्षा गायकवाडदहावी12वी परीक्षाशिक्षण