इंडिया मेरिटाइम वीक २०२५मध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे ५६ हजार कोटी रुपयांचे करार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 07:10 IST2025-10-28T07:09:31+5:302025-10-28T07:10:11+5:30
सागरी व्यापार अन् उद्योगांचे १५ विविध सामंजस्य करार

इंडिया मेरिटाइम वीक २०२५मध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे ५६ हजार कोटी रुपयांचे करार
मुंबई : इंडिया मेरिटाइम वीक २०२५मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ५५,९६९ कोटी रुपयांचे १५ विविध सामंजस्य करार करण्यात आले. सागरी व्यापार आणि उद्योगाशी संबंधित या करारांच्या माध्यमातून येत्या काळात महाराष्ट्र देशाच्या सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्राचे नेतृत्व करेल, असा विश्वास फडणवीस यांनी
व्यक्त केला.
यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप आणि करार करण्यात आलेल्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने अनेक महत्वाचे सामंजस्य करार झाले.
पर्यावरणपूरक वाहतूक
अनेक कंपन्यांसोबत सागरी इकोसिस्टिम विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सुमारे ५६ हजार कोटी रुपयांचे हे करार आहेत. यामुळे महाराष्ट्राला सागरी व्यापार आणि विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर नेण्यात मदत होईल.
बंदर, वाहतूक, उद्योग आणि व्यवसाय या क्षेत्रातील सुविधा जागतिक दर्जाच्या बनतील. मुंबईसाठी जल वाहतूक महत्त्वाची आहे. रो-रो सेवा सुरू झाल्यानंतर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता गेटवे ऑफ इंडिया ते नवी मुंबई विमानतळदरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल. तसेच, इलेक्ट्रिक व्हेसल ताफा आणला जात आहे, ज्यामुळे जलवाहतूक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनेल, असे ते म्हणाले.