Join us  

महाराष्ट्रातलेही विद्यार्थी 'प्रेझेन्ट सर'ऐवजी 'जय हिंद' म्हणणार?; गुजरातचा कित्ता गिरवण्याचे शिक्षणमंत्र्यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 5:10 PM

देशभक्तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी गुजरातमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हजेरी लावताना येस सर/मॅडम किंवा प्रेझेंट सर/मॅडम म्हणण्याऐवजी आता 'जय हिंद' अथवा 'जय भारत' बोलावे लागणार आहे. गुजरात सरकारचा कित्ता आता महाराष्ट्र सरकारदेखील गिरवणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देजय हिंद अथवा जय भारत बोलून विद्यार्थ्यांनी लावावी हजेरी - गुजरात सरकारदेशभक्तीच्या प्रचारासाठी गुजरात सरकारचा निर्णयगुजरात कित्ता महाराष्ट्र सरकारदेखील गिरवणार का?

मुंबई - देशभक्तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी गुजरातमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हजेरी लावताना येस सर/मॅडम किंवा प्रेझेंट सर/मॅडम म्हणण्याऐवजी आता 'जय हिंद' अथवा 'जय भारत' बोलावे लागणार आहे. शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे.  या अधिसूचनेत सांगण्यात आले आहे की, इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांना 'जय हिंद' अथवा 'जय भारत' बोलून हजेरी लावावी लागणार आहे. सरकारी शाळा, अनुदानित तसंच विनाअनुदानित शाळांना या अधिसूचनेचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 1 जानेवारी 2019पासून या अधिसूचनेच पालन करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.  

दरम्यान, गुजरात सरकारचा हा कित्ता आता महाराष्ट्र सरकारदेखील गिरवणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, गुजरातमधील शाळांमध्ये 'जय हिंद' अथवा 'जय भारत' बोलून हजेरी लावण्याच्या निर्णयाचे राज्याचे शिक्षणमंत्रीविनोद तावडे यांनी समर्थन केले आहे. या निर्णयावरुन देशभरात सुरू झालेल्या चर्चेसंदर्भात 'TIMES NOW' वृत्तवाहिनीने विनोद तावडे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी सांगितले की, '' गुजरात सरकारचा हा निर्णय एक चांगले पाऊल असल्याचे मला वाटते. आपणदेखील असा विचारू करू शकतो. पण अद्याप हे निश्चित करण्यात आलेले नाही. यासाठी अन्य पर्यायदेखील आहेत, त्या पर्यायांचाही विचार करता येऊ शकतो''

दरम्यान, मुला-मुलींमध्ये लहानपणापासूनच देशभक्ती रुजावी, या उद्देशानं संबंधित निर्णय घेण्यात आल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात सोमवारी (31 डिसेंबर) झालेल्या आढावा बैठकीत राज्य शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंह चुदासमा यांनी हा निर्णय घेतला. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनाही अधिसूचनेची प्रत पाठवण्यात आल्या आहेत, सोबत 1 जानेवारीपासून या आदेशाचं पालन करण्यात यावे, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना मारहाणदरम्यान, काही दिवसांपूर्वी शाळेच्या मुख्याध्यापकांनी कथित स्वरुपात विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे वृत्त समोर आले होते. इस्लामिक पद्धतीने अभिवादन न करता गुड मॉर्निंग म्हटल्यानं मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, अशी माहिती समोर आली होती. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील शाहजहापूर येथील आहे. मुख्याध्यापक चांद मियाँ यांना जेव्हा आम्ही विद्यार्थी गुड मॉर्निंग म्हणत असू, तेव्हा ते आम्हाला  'अस्सलाम वालेकुम' म्हणण्याची सक्ती करायचे, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी तपास अधिकाऱ्यांकडे केली होती. या प्रकरणाच्या तपासणीदरम्यान मुख्याध्यापक दोषी आढळल्यानं त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. 

टॅग्स :शिक्षणशिक्षण क्षेत्रविनोद तावडेशाळा