Maharashtra Politics : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे . हे अधिवेशन वादविवाद आणि आरोप-प्रत्यारोपांसह इतर विविध कारणांमुळे वादळी ठरत आहे. आज मुंबईच्या विकास कामावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुंबई महानगर पालिका आणि मराठी मुद्द्यावरूनही शिंदे यांनी ठाकरे गटाला सुनावले.
यावेळी मिठी नदीच्या गाळ काढण्याचा मुद्दा काढत ठाकरेंवर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मिठी नदीततला गाळ कोण काढतोय, यांना गाळ काढायला मराठी माणूस नाही दिसला, तर दिनो मोरिया दिसला. तिथ यांना मोरे दिसला नाही. पण, दिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होणार, असं सांगत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला.
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
धारावी हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प
एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईबाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत येईल, क्लस्टरच्या माध्यमातून आपण अनेक योजना आणत आहोत. कोळी वाड्याच्याबाबत देखील आपण निर्णय घेतला आहे, बदल घडवण्याचे काम आपण करत आहे. धारावी हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे, आपण धारावीच्या विकासासाठी जमीन देतोय. पूर्वीच्या सरकारने निर्णय फक्त पात्र लोकांसाठी घेतला होता. पण आम्ही पात्र आणि अपात्र लोकांसाठी निर्णय घेतला आहे.
"निवडणूक झाली नसली तरी कोणतीही काम थांबलेली नाहीत. मुंबईत बदल होत आहे, मुंबईकर आमच्यासाठी फर्स्ट आहेत आणि इतरांसाठी कंत्राटदार फर्स्ट आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा चहल यांना बोलावले आणि खड्यांच्या संदर्भात सांगितले आणि त्यानंतर दोन फेजमध्ये सर्व रस्ते करण्याचे आदेश दिले. पहिला फेज पूर्ण झाला आहे, आपण काँक्रीटीकरण करत आहोत, त्यामुळे मुंबई खड्डेमुक्त होईल. मुंबई आणि एमएमआर रिजन १.५ ट्रिलियन डॉलरची क्षमता आहे. आमच्यावर मुंबई तोडण्याचा आरोप होतोय पण आम्ही जोडणारे आहोत, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.