Join us

राष्ट्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस ठरले अव्वल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 03:06 IST

५ सुवर्ण पदकांसह एकूण १२ पदके : देशभरातील ३० संघ सहभागी

मुंबई : अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस दलाने सर्वच गटामध्ये वर्चस्व मिळवित सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे ६२वा राष्ट्रीय कर्तव्य मेळावा १६ ते २० जुलै दरम्यान पार पडला. यात देशभरातील ३० राज्य पोलीस संघाचे १,२५० स्पर्धक सहभागी झाले होते.

व्यवसायिक आणि गुन्हे तपास शैलीचा कस पाहणाऱ्या या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाने ५ सुवर्ण, ३ रौप्य व ४ कास्य अशी एकूण १३ पदके पटकावली. कर्तव्य मेळाव्यात सर्वसाधारण विजेता ठरण्याचा मान महाराष्ट्र पोलीस दलाला पहिल्यादाच मिळाला आहे, असे या संघाचे मार्गदर्शक व राज्य गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

कर्तव्य मेळाव्यात सहभागी होण्यापूर्वी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे व्यवसायिक नैपुण्य व कौशल्य वाढविण्यासाठी पुण्यात सराव शिबिर झाले होते. त्यानंतर, संघ व्यवस्थापक अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या नेतृत्वाखाली ४० स्पर्धक रवाना झाले होते. त्या ठिकाणी सायंटिफिक एड टु इन्व्हेस्टिगेशन (विज्ञान शास्त्राची तपासात मदत), घातपात विरोधी तपासणी स्पर्धा, संगणक, पोलीस फोटोग्राफी आदी प्रकारांत स्पर्धा घेण्यात आल्या.

तपासात विज्ञान शास्त्राची मदत- अमोल पवार (सहायक निरीक्षक, लातूर), नितीन गीते (निरीक्षक मुंबई शहर), राहुल खटावकर (सहायक निरीक्षक, औरंगाबाद शहर) यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावले, तर फॉरेन्सिक सायन्स - नितीन गीते (मुंबई), इकबाल शेख (हवालदार सोलापूर ग्रामीण) राखी खवले (हवालदार, सीआयडी), अतुल जाधव (हवालदार, सातारा) हा संघ विजेता ठरला. संगणक जागृती स्पर्धेत सहाय्यक फौजदार विजय कुंभार (वायरलेस, पुणे) व कॉन्स्टेबल हणुमंत भोसले (सातारा) व पोलीस व्हिडीओ ग्राफीमध्ये समीर बेंदगुडे (नाईक, एसआरपीएफ) यांनी रौप्य पदक मिळविले. महाराष्ट्र पोलीस संघाला महासंचालक सुबोध जयस्वाल, सीआयडीचे अप्पर महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विशेष महानिरीक्षक दत्तात्रय मंडलिक व प्रवीण साळुंखे यांचे मार्गदर्शन मिळाले.

टॅग्स :महाराष्ट्रपोलिस