Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : घाटकोपरमधील मताधिक्य संजय दिना पाटील यांच्यासाठी ठरले बोनस 

By मनीषा म्हात्रे | Published: June 6, 2024 01:17 PM2024-06-06T13:17:50+5:302024-06-06T13:18:39+5:30

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात भाजपला धक्का 

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : A bonus for Sanjay Dina Patil who won the majority of votes in Ghatkopar  | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : घाटकोपरमधील मताधिक्य संजय दिना पाटील यांच्यासाठी ठरले बोनस 

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : घाटकोपरमधील मताधिक्य संजय दिना पाटील यांच्यासाठी ठरले बोनस 

मुंबई : उत्तर पूर्व मुंबईत दगडफेक, अवैध धंदे आणि नामकरणामुळे चर्चेत आलेल्या मानखुर्द शिवाजी नगरमधील वाढलेल्या टक्केवारीने धाकधूक वाढली असतानाच, या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी सर्वाधिक ८७ हजार ९७१ मतांनी आघाडी घेतली. हीच आघाडी त्यांच्या यशासाठी महत्त्वाचा वाटा ठरली आहे. दुसरीकडे भाजपच्या घाटकोपर पश्चिमेचा बालेकिल्ल्यातही पाटील यांना मिळालेली आघाडी भाजपसाठी धक्कादायक तर पाटलांसाठी बोनस ठरलेली दिसून आली.     

मुंबई उत्तर पूर्वमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील आणि महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्यात अटीतटीची लढत पार पडली. मतदार संघात एकूण मतदार १६ लाख ३६ हजार ८९० असून त्यापैकी ९ लाख २२ हजार ७६० जणांनी मतदान केले. येथील मुलूंड, भांडूप पश्चिम, विक्रोळी, घाटकोपर (पश्चिम) , घाटकोपर (पूर्व) आणि मानखुर्द-शिवाजीनगर या सहा विधानसभा मतदारसंघापैकी भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या मुलुंड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६१.३३ टक्के, घाटकोपर पूर्वेकडे ५७.८५ टक्के मतदान तर घाटकोपर पश्चिम मध्ये ५५.९० टक्के मतदान झाले. हे तिन्ही मतदार संघ कोटेचा यांच्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जात असताना कोटेचा यांनी मुलुंडमध्ये ६० हजार ४४२ मतांनी तर घाटकोपर पूर्व मध्ये ३३ हजार ६०९ मतांनी आघाडी घेतली. मात्र हे अपेक्षेपेक्षा कमी होते. तर, घाटकोपर पश्चिम भागात भाजपला धक्का बसला. भाजप आमदार राम कदम येथे असतानाही संजय पाटील यांनी ७९ हजार १४२ मते घेत १५ हजार ७७२ मतांनी आघाडी घेतली.    

तीच आघाडी ठरली निर्णायक
 कोकणी मराठी मतदार असलेल्या भांडूपमध्ये पाटील यांनी ३ हजार ४५८ तर विक्रोळीतून १५ हजार ८६५ मतांनी आघाडीवर होते. या भागात सेनेचे दोन आमदार असल्याने येथील मतांचा संजय पाटील यांना फायदा झालेला दिसून आला. यापैकी मानखुर्द शिवाजी नगर येथील वाढलेले मतदान निर्णायक ठरले आहे. 
 २०१४ मध्ये या मतदार संघात ४० टक्के तर २०१९ मध्ये ४७ टक्के मतदान झाले होते. यावेळी ५०.४८ टक्के मतदान झाले. सुरुवातीपासून हा मतदार संघात धार्मिक वाद, त्यानंतर दगडफेक आणि थेट अवैध धंद्याचे केंद्र बनत असल्याच्या आरोप प्रत्यारोपामुळे चर्चेत आला. 
 मतदानाच्या दिवशी येथील अनेक केंद्रावर धीम्या गतीने मतदानाच्या तक्रारीबरोबरच एका ठिकाणी मशीन बंद पडल्याने मतदानाला विलंब झाला. मात्र, तरी देखील मतदार मोठ्या संख्येने उतरले. या मतदार संघातून सर्वाधिक १ लाख १६ हजार ७२ मते घेत पाटील यांनी ८७ हजार मतांनी आघाडी घेतली. याच आघाडीने भाजपला धक्का दिला.

पाटील यांच्या मतांमध्ये वाढ 
संजय दिना पाटील हे २००९ पासून आतापर्यंत सव्वा दोन लाखापर्यंत मते पडत होती. यावेळी मतांमध्ये दोन लाखांची भर पडत हा आकडा थेट ४ लाख ५० हजार ९३७ वर गेला. मानखुर्द शिवाजी नगरचे एकगठ्ठा मतदान आणि सेनेच्या मतांमुळे यात भर पडली आहे.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : A bonus for Sanjay Dina Patil who won the majority of votes in Ghatkopar 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.