Maharashtra Lockdown : धावणारी मुंबई थांबली, वीकेंड लॉकडाऊन; अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित दुकाने बंदच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 07:33 AM2021-04-12T07:33:51+5:302021-04-12T07:35:09+5:30

Maharashtra Lockdown: दक्षिण मुंबईत मस्जिद बंदर आणि डोंगरी परिसरात सकाळी १० पर्यंत किंचित गर्दी हाेती, लोक कामानिमित्त घराबाहेर पडले होते. परंतु हे प्रमाण कमी होते.

Maharashtra Lockdown: Running Mumbai stops, Weekend Lockdown; All shops are closed except for essential services | Maharashtra Lockdown : धावणारी मुंबई थांबली, वीकेंड लॉकडाऊन; अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित दुकाने बंदच

Maharashtra Lockdown : धावणारी मुंबई थांबली, वीकेंड लॉकडाऊन; अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित दुकाने बंदच

Next

मुंबई : रविवारचा वीकेंड लॉकडाऊन मुंबईकरांनी १०० टक्के यशस्वी केला. पहाटेपासून रात्र होईपर्यंत मुंबई शहरात सर्वच ठिकाणी अत्यावश्यक सेवावगळल्या तर उर्वरित सर्व सेवा बंद होत्या. सकाळी १० वाजेपर्यंत काही ठिकाणी दुकाने खुली करण्यात आली होती. मात्र त्यांचे शटर अर्धेच उघडे होते. काही किराणामालाची दुकाने सुरू होती, मात्र हे प्रमाण कमी होते.
दक्षिण मुंबईत मस्जिद बंदर आणि डोंगरी परिसरात सकाळी १० पर्यंत किंचित गर्दी हाेती, लोक कामानिमित्त घराबाहेर पडले होते. परंतु हे प्रमाण कमी होते. लालबाग, वरळी, लोअर परळ परिसरातही सकाळपासूनच शुकशुकाट होता. रस्त्यांवर वाहनांची आणि माणसांची गर्दी नव्हती. सार्वजनिक वाहतूक सेवावगळली तरी खासगी वाहतूकही बऱ्यापैकी कमी होती. अत्यावश्यक सेवेसाठी धावणारी वाहने वगळली तर मुंबईच्या रस्त्यांवर फार काही वाहने धावत नव्हती.
माहीम, माटुंगा, सायन, कुर्ला, विलेपार्ले, सांताक्रुझ, घाटकोपर, साकीनाका, अंधेरी आणि बोरीवलीसह मालाड येथे सर्वच काही बंद होते. विशेषत: बाजारपेठा आणि दुकाने बंद असल्याने धावत्या मुंबईला ब्रेक लागला होता. कोरोनाच्या समूळ उच्चाटन करण्यासाठी, ब्रेक द चेनसाठी मुंबईकरांनी रविवारीदेखील वीकेंड लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद दिला. सकाळी, दुपारी आणि सायंकाळी काही ठिकाणी, चौकात किंवा नाक्यांवर तरुणांची, कामगारांची गर्दी दिसत असली तरी हे प्रमाण कमी होते.
दादरसारख्या नेहमीच्या वर्दळीच्या ठिकाणी मात्र सकाळी काही प्रमाणात गर्दी दिसून आली. दुपारी हे प्रमाण ओसरले होते. मालाड येथे सकाळी हीच अवस्था होती. मालाड येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद घोलप यांनी येथील निरीक्षण नोंदविताना सांगितले की, सरकारने स्टेशनरी आणि झेरॉक्सची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली पाहिजे, कारण सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यांना झेरॉक्स किंवा स्टेशनरी लागत आहे.
एकूणच मुंबईतील बाजारपेठांमध्ये व रस्त्यांवर शुकशुकाट होता. विकेंड लाॅकडाऊनला नागरिकांनी प्रतिसाद दिला. किराणा व भाजीपाला घेतल्यानंतर बहुतांश जणांनी घरातच राहणे पसंत केले. 

धारावीत बहुतांश दुकाने होती बंद 
- दादर मार्केट परिसरात 
सकाळी मोठी गर्दी होती. येथे नियमांचे उल्लंघन झाले होते. 
मात्र दुपारी येथील गर्दी विरली. 
पूर्व आणि पश्चिम परिसरातील रस्त्यांवरील किंचित गर्दी 
वगळली तर बऱ्यापैकी शुकशुकाट होता. दोन्ही बाजूंची दुकाने पूर्ण वेळ बंद होती. दुकानांमधील 
काही कारागीर दुकानांबाहेर ताटळकत होते. मात्र ही गर्दीदेखील नंतर 
कमी झाली. अत्यावश्यक 
सेवावगळता उर्वरित सेवा बंद होत्या. धारावी परिसरातही मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊन पाळला गेला. धारावीमधील बहुतांश 
दुकाने बंद होती. 
मात्र नागरिक रस्त्यांवर फिरताना दिसत होते. येथील रस्त्यांवर 
गर्दी नसली तरी बाहेर पडत असलेल्या लोकांचे प्रमाण अधिक होते. दक्षिण मुंबईतील मनीष मार्केट बंद होते. मुळात येथील बाजारपेठ गेल्या काही दिवसांपासून निर्बंधांमुळे बंदच आहेत.


मुंबईत रविवारीदेखील बाजारपेठा ओस

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत त्यापार्श्वभूमीवर राज्यात विकेंड लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे अनेकजण घराबाहेर पडत नव्हते रविवार असूनही बाजारपेठा ओसाड पडल्याचे चित्र होते. शनिवारप्रमाणे रविवारीही दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण मुंबईत शुकशुकाट होता. छोट्या आणि मोठ्या बाजारपेठांसह बहुतांश सर्वच दुकाने दिवसभर बंद होती. काही अपवादात्मक ठिकाणी दुकानांचे शटर अर्धे खुले ठेवून व्यवहार होत होते.

दक्षिण मुंबईत बंद
कोरोना साखळी तोडण्यासाठी सरकारने केलेल्या विकेंड लॉकडाऊनचे आवाहन केले होते. रविवारी मुंबईकरांनी एकत्र येणे, फिरणे, घराबाहेर पडणे टाळले. काही सोसायटी अथवा रहिवासी क्षेत्रात काही दुकाने सुरू करण्यात आली होती. मात्र हे प्रमाण तुलनेने फारच कमी होते. अगदीच दूध, अंडी किंवा इतर महत्त्वाचे साहित्य घेण्यासाठी किराणा दुकानांकडे नागरिक फिरकत होते. द दक्षिण मुंबईतील मनीष मार्केटसह मस्जिद बंदर येथील बहुतांश दुकाने बंद होती. मनीष मार्केटसारखे मोठे मार्केटच बंद असल्याने दक्षिण मुंबईतील परिसरात शुकशुकाट होता. मनीष मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी व्यापार, व्यवहार ठप्प आहे. 

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सात दिवस आधी सांगितले त्यामुळे तयारी करून दोन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. पण यापुढे लॉकडाऊन लावण्याची चर्चा आहे. मात्र सरकारकडे एक्सिट प्लॅन नाही. सरकारने कामगार, उद्योजक, व्यावसायिक यांना दिलासा द्यावा मग लॉकडाऊन करावा.
- अनिल फोंडेकर, अध्यक्ष, 
मुंबई व्यापारी असोसिएशन

दादर निर्मनुष्य 
दादर येथे सकाळी वर्दळ असली तरी नंतर मात्र येथील गर्दी कमी झाली. मुंबईमधील सर्वच प्रमुख रस्त्यांवर गर्दी नव्हती. रोजच्या तुलनेत शनिवारी धावणाऱ्या वाहनांचे प्रमाण कमी होते. शिवाय एस. टी., बेस्ट बससह रिक्षा आणि टॅक्सीही कमी प्रमाणात रस्त्यांवर उतरल्या होत्या. 

Web Title: Maharashtra Lockdown: Running Mumbai stops, Weekend Lockdown; All shops are closed except for essential services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.