Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून विधिमंडळाचे अधिवेशन; विरोधकांचे लक्ष्य गृहखाते! मविआला संधी, सत्तापक्षाची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 05:58 IST

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धवसेनेचा आग्रह असेल. काही आमदारांनी आदित्य ठाकरे यांचेही नाव उचलून धरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील बलात्काराची घटना, यासह कायदा-सुव्यवस्थेवरून गृह खात्याला विरोधक लक्ष्य करतील, अशी शक्यता आहे.

विधानसभेतील दारूण पराभवानंतर नाउमेद झालेल्या महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून समन्वयाचा पूर्ण अभाव दिसत आहे. तीन पक्षांमधील नेते एकमेकांविरुद्ध आरोप करतानाही दिसून आले. अशा परिस्थितीत अधिवेशनामध्ये विरोधकांची एकजूट राहणार की नाही, यावर ते सत्तापक्षाची कितपत कोंडी करू शकतील, हे अवलंबून असेल. एकजूट दाखवण्याची विरोधकांना अधिवेशनात संधी असेल. 

चहापान की बहिष्कार?

अधिवेशनाची रणनीती ठरण्यासाठी मविआ घटक पक्षांची बैठक रविवारी दुपारी होईल. सायंकाळी मुख्यमंत्र्यांचे चहापान असेल. या चहापानाला जायचे की नाही, याचा निर्णय विरोधक त्यांच्या बैठकीत करतील. चहापानावर बहिष्कार टाकतील, अशी शक्यता अधिक आहे.

विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही?

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. मविआतील कोणत्याही घटक पक्षाकडे २८ पेक्षा जास्त आमदार नाहीत. विरोधी पक्षनेते पदासाठी एक दशांश आमदार हे पद मागणाऱ्या पक्षाकडे असायला हवेत, असा नियम नाही. विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धवसेनेचा आग्रह असेल. तो मान्य झाला तर भास्कर जाधव यांना हे पद दिले जाऊ शकते. काही आमदारांनी आदित्य ठाकरे यांचेही नाव उचलून धरले आहे.

मुंडे, कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी दबाव

बीड जिल्ह्यातील वाढती गुंडगिरी आणि कृषी खात्यातील कथित गैरव्यवहारांप्रकरणी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक अधिवेशनात हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्षे कैद्याची शिक्षा सुनावलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक दबाव आणतील.

लाडक्या बहिणीसह विविध मुद्द्यांवर सरकारने यू टर्न घेतला आहे. त्यांच्या मंत्र्यांवर त्यांचेच आमदार गंभीर आरोप करत आहेत. सरकारला जाब विचारू. - विजय वडेट्टीवार, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते.

विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याची सरकारची तयारी आहे. गोंधळ हे कोणत्याही प्रश्नावर उत्तर असू शकत नाही. तेव्हा चर्चा करावी. - चंद्रकांत पाटील, संसदीय कामकाज मंत्री.

 

टॅग्स :विधान भवनविधानसभाअर्थसंकल्पीय अधिवेशनविधान परिषदमहाविकास आघाडीमहाराष्ट्र विकास आघाडीमहायुती