परकीय गुंतवणूकदारांची महाराष्ट्र पहिली पसंती; देशातील ४०% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 10:25 IST2025-05-30T10:25:35+5:302025-05-30T10:25:35+5:30
परकीय गुंतवणुकीत देश पातळीवर महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे.

परकीय गुंतवणूकदारांची महाराष्ट्र पहिली पसंती; देशातील ४०% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात
मुंबई : परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र ही गुंतवणूकदारांची पहिली पसंती असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. परकीय गुंतवणुकीत देश पातळीवर महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्याने एकूण १,६४,८७५ कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण ४,२१,९२९ कोटी रुपयांपैकी तब्बल ४० टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात ३२ टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
गत आर्थिक वर्षात (जानेवारी ते मार्च २०२५) शेवटच्या तिमाहीत २५,४४१ कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. हे वर्ष महाराष्ट्रासाठी विक्रमी ठरले असून, मागील दहा वर्षातील सर्वोच्च परकीय गुंतवणुकीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. विशेष म्हणजे, हा उच्चांक आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांतच पार झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
१,२०० सेवा व्हॉट्सअॅपवर
राज्य शासन १,२०० सेवा व्हॉट्सअॅपवर देणार आहे. मोबाइलवरच तुम्हाला विविध प्रमाणपत्र प्राप्त होणार असून, याद्वारे लोकाभिमुख, पारदर्शी व गतिमान प्रशासन देण्याचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
प्रगती सुरूच राहील
महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्वाखाली राज्याची प्रगती अशीच सुरू राहील- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री