Maharashtra Gram Panchayat Results: People have faith in Mahavikas Aghadi, said Minister Aditya Thackeray | Maharashtra Gram Panchayat Results: शहरांपासून गावांमधील जनतेचाही महाविकास आघाडीवर विश्वास आहे, हे सिद्ध झालं- आदित्य ठाकरे

Maharashtra Gram Panchayat Results: शहरांपासून गावांमधील जनतेचाही महाविकास आघाडीवर विश्वास आहे, हे सिद्ध झालं- आदित्य ठाकरे

मुंबई: राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये कडवी टक्कर दिसून येत आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीही ग्रामीण भागातील आपला जनाधार कायम राखताना दिसत आहे. 

ग्रामपंचायतीच्या निकालात महाविकास आघाडीतल शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुरस्कृत पॅनेलला घवघवीत यश मिळताना दिसत आहे. ग्रामपंचायतीच्या या निकालांवर मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झाला, असं मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच शहरांपासून गावांपर्यंत लोकांचा या सरकारवर विश्वास आहे. कोराना काळात सरकारने परिस्थिती कशी हाताळली आहे, हे लोकांनी बघितलं आहे. पर्यावरणाचा समतोल राखत विकास करत आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आपापले प्राबल्य असलेल्या ठिकाणी चांगली कामगिरी केल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. निवडून आलेल्या सदस्यांना विकास कामांसाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासनही अजित पवारांनी यावेळी दिलं.

ग्रामपंचायत निवडणुकीतील मतमोजणी सुरू असून आतापर्यंत भाजपाने ६७८, शिवसेनेनं ७१४, राष्ट्रवादीने ५७८, काँग्रेसने ५२० तर मनसेने १४  ग्रामपंचायतींवर विजय मिळवलेला आहे. तसंच अपक्षांनीही ८५८ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत.

दरम्यान, राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज हाती येणार आहे. या निकालाची आता लाखो उमेदवारांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. या निवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ७९ टक्के मतदान झाले होते. आज मतमोजणीला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. 

चंद्रकांत पाटलांच्या गावात शिवसेनेचा सुरुंग-

गारगोटीजवळ असलेल्या खानापूर गावामध्ये शिवसेनेने ९ पैकी सहा जागा जिंकून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना धक्का दिला आहे. महत्वाचे म्हणजे खानापूरमध्ये भाजपाचीच सत्ता होती. यंदा निवडणुकीत शिवसेनेला थोपविण्यासाठी भाजपाने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती देखील केली होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही खानापूरमध्ये ही अनोखी युती झाली होती. खानापूर गावात आबिटकर गटाला रोखण्यासाठी भाजपाने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ घेतली होती. अशातही शिवसेनेने सहा जागांवर विजय मिळविला आहे. 

हिवरे बाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवारांची एकहाती सत्ता-

ग्रामविकासामुळे केवळ राज्यातच नव्हे, तर देशाला दिशादर्शक असणारं 'आदर्श गाव हिवरेबाजार' येथे ३० वर्षांनी  बिनविरोध निवडणुकीची परंपरा प्रथमच खंडित झाली होती. या हिवरेबाजार ग्रामपंचायत निकालाचा सध्या हाती आलेल्या आकडेवारीनूसार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या पॅनलचा सातही जागांवर विजय झाला आहे. हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांची एकहाती सत्ता आली आहे. पोपटराव पवार यांच्या पॅनलने सातही जागांवर विजय मिळवलेला आहे. आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये तब्बल ३० वर्षांनंतर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Gram Panchayat Results: People have faith in Mahavikas Aghadi, said Minister Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.