Maharashtra Government: उद्धव ठाकरे सरकारकडे स्पष्ट बहुमत; मतदानाच्या वेळी भाजपचा सभात्याग

By अतुल कुलकर्णी | Published: December 1, 2019 06:00 AM2019-12-01T06:00:58+5:302019-12-01T06:07:13+5:30

मनसेचे प्रमोद पाटील, एमआयएमचे मोहम्मद इस्माइल व डॉ.फारुख शहा व माकपचे विनोद निकोले तटस्थ राहिले.

Maharashtra Government: Uddhav Thackeray Govt clear majority; BJP member out of house during the time of voting | Maharashtra Government: उद्धव ठाकरे सरकारकडे स्पष्ट बहुमत; मतदानाच्या वेळी भाजपचा सभात्याग

Maharashtra Government: उद्धव ठाकरे सरकारकडे स्पष्ट बहुमत; मतदानाच्या वेळी भाजपचा सभात्याग

Next

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्टÑवादी व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारने शनिवारी विधानसभेत १६९ आमदारांच्या पाठिंब्यावर आपले स्पष्ट बहुमत सिद्ध केले. भाजपने मात्र आक्षेप घेऊ न मतदानाआधी सभात्याग केला. सरकारकडे बहुमत आहे का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतदानाचे प्रक्षेपण करण्यात आले.
बहुमत सिद्ध केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, आज एक परीक्षा पास झालो, उद्या दुसरा पेपर आहे. त्याचा निकाल लागला की मी तुमच्याशी बोलेन. आता उद्याच्या नियोजनाला लागलो आहे. खा. संजय राऊत आमच्याकडे १७० आमदार असल्याचे सांगत होते. शनिवारी झाले तसेच. सरकारच्या बाजूने १६९ मते पडली. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील सरकारच्या बाजूने असूनही त्यांच्या मताची गरज भासली नाही.
मनसेचे प्रमोद पाटील, एमआयएमचे मोहम्मद इस्माइल व डॉ.फारुख शहा व माकपचे विनोद निकोले तटस्थ राहिले. आधी भाजपसोबत जाण्याचा निर्णय जाहीर करणाऱ्या बहुजन विकास आघाडीचे तीन व शेकापचे श्यामसुंदर शिंदे यांनी सरकारच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे भाजपकडे आता ११४ आमदार आहेत. शिरगणतीमुळे घोडेबाजार टळला आणि राज्याने बºयाच वर्षांनी उत्कंठावर्धक मतदान पाहिले.
‘उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा विश्वास व्यक्त करते’ असा ठराव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडला. राष्टÑवादीचे नवाब मलिक, जयंत पाटील, शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी त्यास अनुमोदन दिले.

...आणि बाके वाजली
शीरगणतीसाठी प्रत्येक आमदाराने उभे राहून आपले नाव व क्रमांक सांगणे सुरू केले. बहुमताचा १४५ हा जादूई आकडा पारनेरचे निलेश लंके यांनी उच्चारताच सत्ताधारी सदस्यांनी आनंदाने बाके वाजवली. सरकारच्या बाजूने पहिले मतदान एकनाथ शिंदे यांनी, तर १६९ वे मतदान विक्रमसिंह जाधव यांनी केले.

हंगामी अध्यक्षांची जोरदार बॅटिंग
हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांच्या नेमणुकीची शिफारस सरकारने राज्यपालांना केली होती. त्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिक्कामोर्तब केले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाआधी घेतलेल्या आक्षेपांना वळसे-पाटील यांनी जोरकसपणे उत्तर दिले. नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी वळसे पाटील यांचे कौतुक केले.

गॅलरीत खरगे, तटकरे, सुप्रिया सुळे
बहुमत सिद्ध होईस्तोवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, राष्टÑवादीचे सरचिटणीस खा. सुनील तटकरे व खा. सुप्रिया सुळे प्रेक्षक गॅलरीत बसून होते. उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव व शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर अधिकाऱ्यांच्या गॅलरीत बसले होते.

स्वत:चा क्रमांक सांगताना हे चुकले
क्रमाने सदस्याने आपले नाव व क्रमांक सांगायचा असतो. मात्र राजन साळवी, मंगेश कुडाळकर, जितेंद्र आव्हाड, बालाजी कल्याणकर, संतोष बांगर, मनोहर कारेमोरे, अस्लम शेख हे सात जण आपला क्रमांक चुकले. अधिकाºयांना व अन्य सदस्यांनी त्यांना क्रमांक दुरुस्त करायला सांगितला.

अबू आझमींच्या विधानावर टाळ्या
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करताना, संघर्षाच्या क्षणी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगितले. तेव्हा शिवसेना सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. यूपी, बिहारमधून पोटासाठी लोक महाराष्ट्रात येतात. त्यांना न्याय द्या, तेही आपले गुणगान करतील असेही ते म्हणताच, सभागृहात जोरदार हशा पिकला.

Web Title: Maharashtra Government: Uddhav Thackeray Govt clear majority; BJP member out of house during the time of voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.