Join us  

Maharashtra Government: भाजपासोबत गेल्यामुळे शिवसेना बिघडली - नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 6:12 PM

सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

मुंबई : सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अवघ्या साडेतीन दिवसाचे 'देवेंद्र सरकार-2' कोसळल्यानंतर आता राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकासआघाडीचे सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आज या तिन्ही पक्षांचा गटनेता निवडला जाणार आहे. त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करण्यात येणार आहे. 

याविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातून भाजपाचा अंत होण्यास सुरुवात झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजपाचे पितळ उघडे पडले आहे. शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या हितासाठी झाला होता. मात्र, शिवसेना भाजपासोबत गेल्यामुळे बिघडली होती, असे नवाब मलिक यांनी सांगितले. 

भाजपाने घोडेबाजार करण्याचा खेळखंडोबा केला. मणिपूर, गोवा, कर्नाटकात झाले ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही. भाजपा बहुमत चाचणी सिद्ध करण्यास अपयशी ठरली. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. त्यामुळे हा विजय राज्यातील अकरा कोटी जनतेचा आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.  

याचबरोबर, आज तिन्ही पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत गटनेता म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे जातील. तसेच, मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचा होकार असल्याचेही यावेळी नवाब मलिक यांनी सांगितले. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने भाजपाला उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भाजपाकडे बहुमत नसल्याची कबुली देत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यातील अवघ्या साडेतीन दिवसाचे 'देवेंद्र सरकार-2' कोसळले आहे.  

टॅग्स :नवाब मलिकमहाराष्ट्र सरकारराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाभाजपादेवेंद्र फडणवीस