Join us  

Maharashtra Government: भाजपाला शह देण्याची 'ही' तर शरद पवारांची खेळी?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 4:19 PM

Maharashtra Government News: या संपूर्ण घडामोडीत शरद पवारांची खेळी यशस्वी झाली असल्याचं बोललं जात आहे.

मुंबई - राज्यातील घडामोडीत अवघ्या ४ दिवसांपूर्वी स्थापन झालेले देवेंद्र फडणवीस सरकार आज कोसळलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवारांनी भाजपाशी हातमिळवणी केल्याने सरकार स्थापन करण्यात आलं. मात्र अजित पवारांचे मन वळविण्यात पवार कुटुंबाला यश आले. यात त्यामुळे भाजपा सरकार अल्पमतात गेलं. 

या संपूर्ण घडामोडीत शरद पवारांची खेळी यशस्वी झाली असल्याचं बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने त्यांना विचारलं की, भाजपाला शह देण्यासाठी शरद पवारांनी ही खेळी केली का? त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याबाबत अजित पवारांनाच विचारु शकता. देवेंद्र फडणवीस यांच्या या उत्तरामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. ज्या अजित पवारांच्या मदतीने भाजपाने सरकार स्थापन केलं. ज्यांच्यावर सिंचनाचे अनेक आरोप लावले गेले होते. यामुळे भाजपाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.   

तसेच सकाळी अजित पवारांनी माझी भेट घेतली. त्यात त्यांनी आमच्यासोबत येण्यास अडचण आहे असं सांगत राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा आल्याने आमच्याकडेही बहुमत उरलं नाही. आम्ही आमदार फोडणार नाही, घोडेबाजार करणार नाही असं आम्ही सांगितले होतं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सत्तेसाठी हे तीन पक्ष एकत्र आले, भाजपा विरोधी पक्षासाठी काम करेल. जनतेच्या समस्या सरकारपर्यंत पोहचवेल, जनतेचा आवाज बनवून न्याय देण्याचा प्रयत्न करु. २ चाक असलेले सरकार वेगाने धावतं. तीन चाक असलेले सरकार धावेल पण रिक्षाप्रमाणे तीन चाकं वेगळी झाली तर सरकार कसं धावणार हा प्रश्न, ५ वर्ष आम्ही प्रत्येक क्षेत्रात चांगलं काम केलं. ग्रामीण, शहरी भागात विकास केला. त्याचा परिणाम म्हणून लोकांनी आम्हाला जनादेश दिला. जे काम केलं त्याचं मनापासून समाधान आहे. सिंचन, रोड असे अनेक प्रकल्प झाले, पारदर्शी आणि प्रामाणिकपणे सरकार चालविले. जनतेने जो विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम आम्ही केलं. काही गोष्टी कमी झाल्या, चुकल्या असतील पण आमचं उद्दीष्ट जनतेसाठी काम करण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपाशरद पवारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019महाराष्ट्र सरकार