अहो, थकलो हेलपाटे मारून, आता रेशन कार्ड घ्या ऑनलाइन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 13:11 IST2023-05-28T13:11:09+5:302023-05-28T13:11:28+5:30
कार्यालयांमधून होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी सुविधा

अहो, थकलो हेलपाटे मारून, आता रेशन कार्ड घ्या ऑनलाइन !
मुंबई : सर्वसामान्यांना रेशन कार्ड मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागतात. तेथील एजंटांकडून अधिकचे पैसे मोजून कागदपत्रे देऊन अर्ज करावा लागतो. मात्र, त्यानंतरही रेशन कार्ड मिळेलच याची खात्रीही नसते. त्यामुळे एजंटांसह सरकारी कार्यालयांमधून होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी आता सामान्य नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने मोफत रेशन कार्ड उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता रेशन कार्डसाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही.
रेशन कार्ड ऑनलाइन
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना तसेच राज्य योजनेच्या सर्व शिधापत्रिकाधारकांना ऑनलाइन सेवेद्वारे ई-शिधापत्रिका सुविधा मोफत देण्यात येणार आहे.
ऑनलाइन अर्ज कुठे कराल?
अर्जदारांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई-शिधापत्रिका उपलब्ध करून घेता येईल. यासाठी http://rcmc.mahafood.gov.in या वेबसाइटवरून ही ई-शिधापत्रिका डाउनलोड करता येईल.
शिधापत्रिकाधारकांना ऑनलाइन रेशन कार्ड उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज उरलेली नाही. शासनाचा हा निर्णय कार्डधारकांसाठी खूपच दिलासा देणारा आहे.
प्रशांत काळे,
शिधावाटप उपनियंत्रक