Join us  

Maharashtra Government: काँग्रेस-राष्ट्रवादीची उद्या बैठक; सत्तास्थापनेची कोंडी फुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 7:26 PM

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे.

मुंबई: राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी बैठक झाली होती. मात्र या बैठकीत सत्तास्थापनेवर चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं. त्यातच आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक उद्या (बुधवारी) दिल्लीमध्ये होणार आहे. त्यामुळे या बैठकीनंतर तरी शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याचा तिढा सुटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीची ही बैठक सोनिया गांधी व शरद पवार यांच्या उपस्थितात होणार आहे. तसेच या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे उपस्थित राहणार असून काँग्रेसचे अहमद पटेल, मल्लिकार्जून खरगे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह अन्य नेते देखील उपस्थित असणार आहेत. या बैटकीमध्ये जर शिवसेनेसोबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापन केली तर आगामी येणाऱ्या निवडणुका कोणत्या मुद्यांवर लढवायच्या, त्याचप्रमाणे मुख्यमंत्रिपदाच्या वाटपावर देखील चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात सोमवारी झालेल्या बैठकीनंतर शरद पवार यांनी आम्हाला राज्यपालांनी सहा महिन्याचा अवधी दिलेला आहे. आम्ही राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. शिवसेनेनं १७० आमदारांचा आकडा कुठून आणला याची कल्पना नाही, हा प्रश्न शिवसेना नेत्यांना विचारा असं पवारांनी सांगितले. तसेच राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक झाली यात कॉमन मिनिमम प्रॉग्रामवर चर्चा झाली असल्याचं सांगण्यात आलं मात्र पवारांनी या प्रश्नावर दिलेल्या उत्तराने सगळेच अवाक् झाले. काही ठरलेलंच नाही, तर कशासाठी 'कॉमन मिनिमम प्रॉग्राम' करू, राज्यातील स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी विधानसभा सदस्य म्हणून ते भेटले होते असा दावा शरद पवारांनी केला होता. त्यामुळे राज्यात शिवसेनेसोबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करणार की नाही याचे उत्तर आगामी काही दिवसात मिळणार आहे.

टॅग्स :शरद पवारसोनिया गांधीकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसअशोक चव्हाणशिवसेना