Maharashtra Government makes film 'Tanhaji' tax-free in the state | महाराष्ट्रात 'तान्हाजी' चित्रपट करमुक्त, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

महाराष्ट्रात 'तान्हाजी' चित्रपट करमुक्त, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या, शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित चित्रपट ''तान्हाजी': द अनसंग वॉरियर' हा महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आला आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंच्या कोंढाणा किल्ल्याची शौर्यगाथा 'तान्हाजी'  चित्रपटाच्या माध्यमातून 70 मिमी पडद्यावर आली आहे. 'तान्हाजी' या चित्रपटाने 2020मधील 100 कोटींचा टप्पा गाठणारा पहिला चित्रपट म्हणून मान मिळविला आहे. हा चित्रपट उत्तर प्रदेश, हरयाणा सरकारने करमुक्त केला आहे. त्यानंतर हा चित्रपट महाराष्ट्रातही करमुक्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. अखेर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'तान्हाजी' चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. 

कोंढाणा किल्ला घेताना धारातिर्थी पडलेल्या तानाजी यांच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे म्हटले होते. त्यानंतर, कोंढाणा या किल्ल्यास सिंहगड असे नाव देण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला म्हणून सिंहगड गणला जातो. महाराष्ट्राच्या रणभूमीत तानाजी मालुसरेंनी पराक्रम गाजवला. त्यामुळे, अजय देवगणची भूमिका असलेला 'तान्हाजी' चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा, अशी मागणी करण्यात येत होती. 

दरम्यान, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तान्हाजी' चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याबद्दल एकमत झाल्याची माहिती गेल्या आठवड्यात ट्विट करुन दिली होती. करमणूक करही आता जीएसटीच्या अखत्यारित येत असल्याने राज्य सरकार एसजीएसटीचा परतावा देणार आहे. मुख्यमंत्री लवकरच तशी घोषणा करतील, असे ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केले होते.

Web Title: Maharashtra Government makes film 'Tanhaji' tax-free in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.