Join us  

Maharashtra CM: सीएमओ ट्विटर हॅंडलमध्ये २४ तासांत फेरबदल; उद्धव ठाकरेंचा डीपी काढून ठेवला मंत्रालयाचा फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 2:44 PM

Maharashtra News: यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सीएमओ ट्विटर हँडलवर फडणवीसांचा फोटो डीपीवर ठेवण्यात येत होता.

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाच्या स्पर्धेत शिवसेनेने बाजी मारत भाजपावर मात केली आहे. मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस पदावरुन पायउतार होऊन राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर तातडीने सीएमओ कार्यालयच्या अधिकृत ट्विटर हँडलमध्ये उद्धव ठाकरे यांचा डीपी ठेवण्यात आला होता. मात्र काही तासांमध्ये हा डीपी बदलून मंत्रालयाचा फोटो ठेवण्यात आला. 

यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सीएमओ ट्विटर हँडलवर फडणवीसांचा फोटो डीपीवर ठेवण्यात येत होता. भाजपा सरकारच्या काळात मंत्रालयातील जनसंपर्क विभाग कार्यालयही मोठ्या प्रमाणावर अपडेट झालं. वेबसाईट्स, फेसबुक, ट्विटर, यु-ट्यूब अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर वाढला. क्षणोक्षणीचे अपडेट्स या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविले जातात.

मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यंत्री असताना त्यांचा फोटो डीपीवर ठेवणाऱ्या या टीमने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा का बदलला हा प्रश्न निर्माण होतो. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे पीएमओ कार्यालयाचा डीपी फोटो नरेंद्र मोदी यांचा ठेवण्यात आला आहे. राजकीय नेते ट्विटर हँडलचा वापर करण्यासाठी टीम नेमतात.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा बहुमतात आल्यानंतर नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदावर नियुक्ती झाली. त्यानंतर नव्या पंतप्रधान कार्यालयाकडे पीएमओ कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल सोपविण्यात आले त्यावेळी आधीचे सर्व ट्विट्स डिलीट करण्यात आल्यामुळे भाजपावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर पीएमओने ट्विट करुन याबाबत स्पष्टीकरण दिले होते.  

दरम्यान, गुरुवारी एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधीचा भव्य सोहळा शिवाजी पार्कवर पार पडत असताना दुसरीकडे मात्र वर्षा बंगल्यावर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांची घर सोडण्याची तयारी सुरु होती. फडणवीसांचे घरगुती सामना घेऊन जाण्यासाठी टेम्पो आला होता. त्याचसोबत घरातील साहित्यांची पॅकिंग करण्यासाठी १२ कामगारही होते. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विधानसभा बरखास्त होईपर्यंत राज्यात कोणतंही सरकार आलं नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून फडणवीस कारभार पाहत होते.  

टॅग्स :मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सरकार